Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 7 वाजून 54 मिनिटांनी विसर्जन

एमपीसी न्यूज- पुणेकरांसहित संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन आज, शुक्रवारी सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी मोठ्या भक्तिभावात, ‘गणपती बापा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या !’ च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.

पुणे शहरामध्ये दहा दिवस सुरु असलेल्या गणेशोत्सवाची गुरुवारी (दि. 12) सांगता झाली. मोठ्या उत्साहात आणि जड अंत:करणाने सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मंदिरातून मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावर आला.

श्री विकटविनायक रथामध्ये विराजमान झालेले बाप्पांचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची अलोट गर्दी होती. 1 लाख 21 हजार एलईडी बल्बमध्ये हा रथ उजळून निघाला होता. श्री विकटविनायक रथाच्या 8 खांबांवर आणि मुख्य कळसावर रंगबिरंगी दिवे भाविकांचे डोळे दिपवून टाकत होते. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ अलका टॉकीज चौकात दाखल झाला. त्यावेळी उपस्थित भाविकांनी गणपती बाप्पा मोरया चा जोरदार जयघोष केला. प्रत्येकजण बाप्पाचे हे विलोभनीय रूप आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी आतुर झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर वाजतगाजत ही मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. सकाळी ठीक 7 वाजून 54 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विधिवत दुःखी अंतःकरणाने कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.