Lonavala: प्रचारफेरी काढून अॅड. खंडुजी तिकोणे यांच्या प्रचाराची सांगता

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडुजी तिकोणे यांनी काल (शनिवारी) लोणावळ्यात पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली.

उच्चशिक्षित व काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ असलेल्या अॅड. तिकोणे हे ‘कपबशी’ चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक लढवत आहे. प्रचाराच्या काळात त्यांनी संपूर्ण मावळ तालुका पिंजून काढत मतदारांशी संपर्क साधला. निवडणूक लढविण्यामागील भूमिका त्यांनी मतदारांना समजावून सांगितली. जाहीर सभा किंवा मोठ्या रॅली न काढता घरोघर फिरून मतदारांना थेट भेटण्यावर त्यांनी भर दिला होता.

लोणावळ्यात देखील त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. लोणावळ्यातील प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिरात दर्शन व आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचाराची सांगता केली.

ग्रामीण भागातील स्वाभिमानी मतदार तसेच शहरी भागातील सुशिक्षित मतदार, तरुणवर्ग, महिला मतदार तसेच सर्वधर्मीय मतदार यांना माझा साधेपणा, प्रामाणिकपणा, निवडणूक लढविण्यामागील भूमिका, विचारांशी एकनिष्ठा, विकासाबाबतचे व्हीजन आवडले असून सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अॅड. बी. एस. गाडे पाटील यांच्या प्रमाणे मलाही सक्षम प्रतिनिधी म्हणून मावळची जनता नक्की विधानसभेत पाठवील, असा विश्वास अॅड. तिकोणे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.