दुर्गपूजा संयोजन समितीतर्फे सिंहगडावर दुर्गपूजा

एमपीसी न्यूज – दुर्गपूजा संयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दुर्गपुजा सोहळा 2017’ डोणजे येथील सिंहगड किल्ल्यावर रविवारी (दि.26) उत्साहात पार पडला. दुर्गपुजा संयोजन समितीचे हे 3 रे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह इतर नऊ राज्यातील 131 हून अधिक गड-किल्ल्यांवर एकाचवेळी विविध सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुर्गपूजा करण्यात आली.

सरसेनापती खंडेराव दभाडे यांचे तेरावे वंशज सत्यशीलराजे दाभाडे यांच्या हस्ते सिंहगड किल्ल्यावरील अमृतेश्वर शिवमंदिरात ही दुर्गपूजा संपन्न झाली. यावेळी हनुमान मंडळ प्रतिष्ठान पुणे यांनी पोवाडा गायन व मर्दानी खेळांच्या प्रत्यक्षिकांचे आयोजन केले होते.

दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी. सर्वसामान्य नागरिक व शिवभक्त गड-किल्ल्यांकडे आकर्षित व्हावेत, प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर उपस्थित राहावेत, त्यांना गड-किल्ले पाहण्याची व त्यातून नंतर त्यांच्यात दुर्गसंवर्धनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवाजी ट्रेलच्या वतीने प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर जाऊन दुर्गपूजेचा उपक्रम सुरू करण्यात आला. सन 2013 पर्यंत एकाच गडावर ठरलेल्या वेळी संस्थेचे सर्व सभासद एकत्र जमत असत व दुर्गपूजा करत असत.

संस्थेच्या सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता 2013 नंतर दुर्गपूजा संयोजन समितीची स्थापना करून एकाच वेळी विविध गड-किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्याचे नियोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले. व त्यानुसार 2014 पासून संस्थेच्या वतीने एकाच वेळी विविध गड-किल्ल्यांवर दुर्गपूजेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये 14 गड-किल्ल्यांवर तर 2015 मध्ये 81 गड-किल्ल्यांवर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुर्गपूजा करण्यात आली. फक्त महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर होणारी ही दुर्गपूजा 2016 मध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब, केरळ व तामिळनाडूमधील 121 गड-किल्ल्यांवर करण्यात आली, त्यात विविध सरदार व संस्थानिक घराण्यातील वंशज सहभागी झाले होते.

दुर्गपूजा संयोजन समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, जम्मू, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दमन, गोवा आदी राज्यातील 131 हून अधिक गड-किल्ल्यांवर एकाच वेळी दुर्गपूजा करण्यात आली. यातील सुमारे 40 किल्ल्यांवर शिवकालीन सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील वंशज उपस्थित होते, अशी माहिती दुर्गपूजा संयोजन समिती समन्वयक सुजीत नवले यांनी दिली. 

‘बुक ऑफ रेकार्ड’ने घेतली नोंद

मागील वर्षी (सन 2016) महाराष्ट्रासह सहा राज्यातील 121 किल्ल्यांवर शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून एकाच वेळी दुर्गपूजा संपन्न झाली होती. त्यातील सुमारे 25 किल्ल्यांवर शिवकालीन सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील वंशज उपस्थित होते. या दुर्गपूजांची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकार्ड’ने घेतली आहे, अशी माहिती दुर्ग संवर्धक महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद क्षिरसागर यांनी दिली.

फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारीच पूजा

शालेय विद्यार्थ्यांनी दुर्गपूजेस उपस्थित राहावे व शालेय जीवनापासूनच त्यांच्यामध्ये दुर्गविषयीची गोडी निर्माण व्हावी, यासाठी दुर्गपूजा ही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी करण्यात येते. या उद्देशाने दुर्गपूजा ही फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारीच आयोजित केली जाते तसेच पावसाळ्यापासून बंद असलेली दुर्गसंवर्धन कामे मार्चपासून सुरू होतात, अशी माहिती दुर्गपूजा संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. सुनील कदम यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.