बँकांची अर्थव्यवस्था सुधारल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल – अ‍ॅड. उज्ज्वल निकम

एमपीसी न्यूज – देशाच्या अर्थव्यवस्थेत बँकांची भूमिका ही महत्वाची आहे. बँकांची अर्थव्यवस्था सुधारल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल याचा विचार बँकिग क्षेत्रात काम करणार्‍या सर्व घटकांनी करायला हवा, असे मत राज्याचे सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

शनिवारी (दि. 11) सेंट्रल बँक ऑफिसर्स असोसिएशन, पुणे झोन तर्फे 12 वे त्रैवार्षिक सर्वसाधारण अधिवेशन पुण्यात एस.एम.जोशी सभागृहात घेण्यात आले. या अधिवेशनाचे उद्‌घाटन अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष वाय. सुदर्शन तसेच अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे झोनचे एफजीएम नरेंद्र सिंग, ऑल इंडिया सेंट्रल बँक ऑफिसर्सचे अध्यक्ष सुरेश गुप्ता, उपाध्यक्ष प्रविण ढोक, खजिनदार मनोज वडनेरकर, सचिव एस. बी. रोडे, बी.पी.काळे, के.एस.पावरा बी.हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या अधिवेशनामध्ये अनुत्पादक मालमत्ता, बँकींग क्षेत्रात फाईव्ह डे वीक, सर्व ऑफिसर्सना ट्रेड युनियनचे अधिकार, बँक ऑफिसर्सच्या पेन्शनमध्ये सुधारणा या विषयावर ठराव मांडण्यात आले.

अ‍ॅड. निकम म्हणाले, नोटबंदीमुळे काही फायदे व काही तोटे झाले. हा काळ बँकांसाठी आव्हानात्मक होता. त्यामध्ये काही चुकाही झाल्या मात्र चुका, सुधारता येतात. मी माझे कौशल्य कुठल्या मार्गाने आणखी वाढवू शकतो याचा बँकिंग क्षेत्रातील प्रत्येक घटकाने विचार करणे आवश्यक आहे. सरकारकडून बँकांसाठी नवीन कायदे आणि नियम करण्यात येत आहेत. परंतु मनामध्ये धैर्य असेल तर आपण त्याला सामोरे जावू शकतो अशी खुणगाठ सर्वांनी बाळगली पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेत बँकांची भूमिका ही महत्वाची आहे.त्यामुळे बँकांची अर्थव्यवस्था सुधारल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल याचा विचार बँकिग क्षेत्रात काम करणार्‍या सर्व घटकांनी करायला हवा.

बँक घोटाळ्यांच्या काही प्रकरणात काही वेळा बँकेच्या अधिकार्‍यांचा सहभाग असतो हे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे, ही गंभीर बाब असून भ्रष्टाचाराला आणि बेकायदेशीर गोष्टींना थारा न दिल्यास राष्ट्रीयकृत बँकेचा एनपीए कमी होऊन भारतातील बँकिंग क्षेत्र सक्षम होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नोटबंदीच्या काळात सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी चांगले काम केले. बँकिंग क्षेत्र हे देशाच्या रक्त आणि श्वास आहे. बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहेत. त्याचबरोबर बँकांच्या प्रशासनात आणखी कसा चांगला बदल करता येईल, याचाही विचार करा असे आवाहन त्यांनी केले.

नोटबंदीच्या काळात सर्वच बँक अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेल्या अतिरिक्त कामाची भरपाई मिळावी, तसेच पैशाच्या वाहतूक व सुरक्षेवरील खर्चाची देखील भरपाई मिळावी, ग्रॅच्युईटीच्या रकमेचा मुद्द्यासंदर्भात कायद्यात बदल करणे, या मागण्यांबरोबरच फॅमिली पेन्शन, सुपर अ‍ॅन्यूएशनसंबंधी अनेक मागण्या प्रलंबित असून सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असे वाय. सुदर्शन यांनी यावेळी सांगितले.

एस. बी. रोडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विदुला भट्ट यांनी तर आभार एम. एम. मिर्झा यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.