बांधकाम व्यावसायिकाने ‘फ्लॅट’चे पैसे देण्याच्या तगादा लावल्याने ज्येष्ठाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सदनिका नावावर करुन न देता उर्वरित पैसे देण्याचा बांधकाम व्यावसायिकाने तगादा लावल्याने ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार 4 डिसेंबर 2016 रोजी विजयनगर, काळेवाडी येथे घडला. 


याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सचिन वसंत पाणी (वय 45, रा. पिंपरी) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिव हरी जंगम (वय 60, रा. विजयनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.  याबाबत सदाशिव यांच्या पत्नी सुवर्णा जंगम (वय 50) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सचिन पाणी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सदाशिव जंगम यांनी 2012 मध्ये काळेवाडीतील साई अपार्टमेंटमध्ये पाणी यांच्याकडून सदनिका खरेदी केली. 550 स्क्वेअर फुटाची सदनिका 11 लाख 75 हजार रुपयांना विकत घेतली. त्यापैकी जंगम यांनी पाणी यांना 7 लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम सदनिका नावावर केल्यावर देण्याचे ठरले होते.

पाणी यांनी सदनिका नावावर करुन न देता जंगम यांच्याकडे उर्वरित पैसे देण्याची मागणी केली. पैसे देण्याचा त्यांच्याकडे तगादा लावला. पैसे न दिल्यास सदनिकेतून बाहेर काढण्याची धमकी दिली. पाणी यांच्या त्रासाला कंटाळून सदाशिव यांनी 4 डिसेंबर 2016 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. वाकड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.