महिलांच्या दुस-या माहेरघराने गाठली चाळीशी

(सोनाली टिळक)

 

एमपीसी न्यूज – प्रश्न पडलाना शिर्षक वाचून??? हे महिलांचे दुसरे माहेर म्हणजे नक्की काय? महिलांना हव्या तश्या त्यांना बसल्या ठिकाणी पुढ्यात मिळतील अशा सर्व गोष्टी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे पुणे-लोणावळा लोकल… त्यामुळे लोकल म्हणजे महिलांचे दुसरे माहेरघरंच…रोज कामाच्या निमित्ताने पुणे -लोणावळा प्रवास करणा-या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे घर आणि ऑफिस याशिवाय मोकळा वेळ मिळतो तो फक्त या लोकलमध्येच… त्यामुळे महिलांचे आणि लोकलचे एक वेगळेच नाते निर्माण आहे. मग आता सांगा, याला माहेरघरापेक्षा दुसरे योग्य नाव तरी काय??? आपल्या जीवनातील बराचसा वेळ ज्या लोकलमध्ये जातो त्या लोकलने यंदा चाळीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.  त्यानिमित्ताने लोकलच्या या जुन्याच पण दुर्लक्षित राहिलेल्या पैलूचा घेतलेला आढावा. 

काहींना लोकल म्हणजे फक्त गर्दी, ते एकमेकांचे धक्के आणि त्यातून होणारी भांडणे हेच डोळ्यासमोर येते, पण रोज प्रवास करणा-या महिलांना विचारलेत तर याच लोकलची वेगळी बाजूही तुमच्या समोर येईल, लोकलने तुम्हांला काय दिले याचे खरे उत्तर हे रोज प्रवास करणा-या महिलाच योग्य देऊ शकतात. त्यातून लोकलमधील सुखद  आणि दुःखद प्रवासाचा अनुभवही तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल.

दि. 11 मार्च 1978 रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलची सेवा सुरु करण्यात आली. सुरुवातीला मुंबईवरुन केवळ 2 इएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) रेक आणण्यात आले. कालांतराने रेक वाढवले असून सद्य परिस्थितीत लोकलच्या 44 फेर्‍या होतात. पुणे-लोणावळा दरम्यानचे अंतर 64 किलोमीटर असून दररोज हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात.

तर या लोकलने काय दिले??? यापेक्षा या लोकलने काय नाही दिले….या लोकलने जगण्याची कला शिकवली. असंख्य ओळखी, मित्रमैत्रिणी, गप्पा-गोष्टी, धम्माल मस्ती, एकमेकांना समजून घेण्यासाठी लागणारा वेळ आणि कित्येकदा डोक्यातील खळबळ शांत करण्यासाठी लागणारी शांतता बर हे एवढ्यावरच थांबत नाही तर महिलाचां सर्वात आवडीचा विषय म्हणजे खरेदी. कामाच्या व्यापातून बाहेर जाण्यासाठी वेळ नाही मग काय आहेच लोकल… लोकलमध्ये घरगुती वापरातील वस्तूंबरोबरच कानातले, गळ्यातले सेट्स, बांगड्या, टिकल्या, किचेन्स, खेळणी यापासून स्टोल, साड्या, टॉप, पर्स ते खाण्यापिण्याचे चटपटीत पदार्थ. अशा सगळ्याचीच रेलचेल असते. बर हे फक्त महिलांच्या डब्यात दिसते असेही नाही हं, पुरुषांच्या डब्यातही किचेन्स आणि खेळणी विक्रेते, रुमाल, वॉलेट, पासकव्हर, फोल्डर्स यापासून सगळे काही मिळते. मग याकडे फक्त गर्दी आणि धक्के देणारी लोकल असे म्हणून कसे चालेल.
 

लोकलच्या या चाळीसाव्या वाढदिवसाबद्दल लोकलच्या माहेरवाशिणी आणि फ्रेंडशी मारलेल्या गप्पा….

रुपाली इप्पकलवार – लोकलच्या रोजच्या प्रवासात अडचणी येतातच, पण लोकलमध्ये होणारी मैत्री, गप्पा यामुळे या सगळ्याचा विसर पडतो. लोकलमुळे मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. एक फॅमिली मेंबरप्रमाणे आम्ही राहतो, त्यात एक दिवसही कोणीतरी नसेल तर चूकचूकल्यासारखे होते. आमची वेगवेगळी खरेदी लोकलमध्ये होते. आम्ही रोज भेटल्यानंतर आमच्या दिवसभरात काय काय केलं याबद्दलच्या गप्पा मारतो, यामुळे दिवसभरातील कामाचा थकवा दूर होतो. अडचणीच्या वेळी याच मैत्रिणींचा खूप सपोर्ट असतो. अनुभव सांगायचा झाला तर, एकदा लोकल प्रवासात माझी पर्स हरवली आणि माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते, तेव्हा माझी मैत्रिण माझ्या सोबत होती, तिच्यामुळे मला पुढच्या प्रवासात कोणतीही अडचण आली नाही. असे खूप अनुभव लोकलमुळे अनुभवायला मिळाले आहेत. त्यामुळे आमच्या लाडक्या लोकलला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…

किर्ती शेवडे – लोकलला इतर वाहनांप्रमाणे ट्रॅफिक लागत नाही, त्यामुळे योग्य वेळेत पोहोचवणारी सुविधा म्हणून लोकल हा उत्तम पर्याय आहे. लोकलच्या वेळांमुळे कधीतरी गडबड होते, मात्र लोकलचे मोटरमन काकांशीही या प्रवासादरम्यान ओळख झाली आहे. त्यामुळे प्रवासी पळत येताना बघून तेही सेकंदभर का होईना गाडी थांबवून मदत करतात. लोकलमध्ये वेगवगळे सण आम्ही एकत्र साजरे करतो. आम्ही एकमेकींना मदत करत असतो. तसेच प्रवासातील ओळखींमुळे अनेक नवीन गोष्टी, घडामोडी ऐकायला आणि अनुभवायला मिळतात. लोकल म्हणजे माझ्यासाठी मैत्रिणींसोबत रिलॅक्सेशनसाठीची हक्काची जागा आहे. 

राणीका शिंगाडे – लोकलचे एक वेगळेच जग असते. गर्दीमध्ये वादावादीतून होणारी भांडणे, तसेच त्यामध्ये एकमेकींना आधारासाठी दिलेला हात यातूनही खूप शिकायला मिळते. सगळे एकत्र असल्यामुळे सुरक्षित वाटते. एकमेकांना मदत करण्याची कला खूपदा लोकलमधूनच कळते. रोज नव्याने होणा-या ओळखीमुळे रोजचा थकवा जाऊन रिफ्रेश वाटते. त्यामुळे रोजची ठरलेली लोकल जरी चूकली तरी कसंसं होतं. मात्र रोज नवीन चेहरे घेऊन येणारी लोकल खूप आपलीशी वाटते. या लोकलमुळे रोज आवर्जून मैत्रिणींशी भेट होते. तसेच अजून एक खासियत म्हणजे यामध्ये दररोज काहीना काही नवीन खरेदी करता येते. बाहेर जाऊन खरेदी करण्याएवढा वेळ नसतो. त्यामुळे लोकलमध्येच आमची खूप शॉपींग होत असते. त्यामुळे विंडो शॉपींग प्रमाणेच काही दिवसात लोकल शॉपींगचा ट्रेंड आला तर यात नवल नको वाटायला. अशा आमच्या जीवनातील विविध गोष्टी आमच्याशी कायम जपणा-या लोकलला हॅपी बर्थ डे….
  

मुलांचेही लोकलशी वेगळेच नाते

मुलांसाठी लोकल म्हणजे आमची मैत्रीण वाटते. या लोकलने अनेक मित्र दिले. या मित्रांमध्ये प्राध्यापाकांपासून शेतकऱ्यापर्यंत सर्वच आहेत. अनेक वेळा प्रवासात विविध विषयावर चर्चा होते. यामध्ये अनेकवेळा राजकीय आणि शेतक-यांच्या हिताचे विषय चर्चिले जातात. नोकरीनिमित्त अनेक वर्षांपासून याच लोकलने प्रवास केला जातो. नवीन जनरेशनचे विचार देखील या लोकलमध्ये समजतात, याचा आपल्या वैयक्तिक जीवनात फायदा होतोच. आमच्या डब्ब्यातील एखादी व्यक्ती जरी गैरहजर असेल तर लगेच लक्षात येते. दररोजच्या एकत्र प्रवासामुळे एकप्रकारचे आमच्यामध्ये नाते निर्माण झाले आहे. यातून अनेकप्रसंगी आम्ही एकमेकांच्या मदतीला ही येतो. डब्ब्यात अनेक गरजवंत विद्यार्थीही असतात, या होणा-या चर्चांमधून कोणाच्या ऑफीसमध्ये व्हेकेन्सी आहे किंवा इतर जॉबची माहिती याचीही देवाणघेवाण केली जाते. 


अशा रोजच्या स्पर्धेच्या आयुष्यात वेगवेगळे धक्के देत आयुष्य जगण्याची विविध कला शिकवणा-या सर्वांच्या आवडत्या लोकलला वाढदिवसासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.