पिंपरीच्या महापौरपदी भाजपचे नितीन काळजे बिनविरोध

एमपीसी न्यूज-  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे यांची आज(मंगळवारी) बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे यांनी माघार घेतल्यामुळे पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी काळजे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.  

काळजे हे पिंपरी महापालिकेच्या इतिहासातील भाजपचे पहिले महापौर ठरले आहेत. नितीन काळजे हे महापालिकेचे 24 वे महापौर ठरले. नव्याने समाविष्ट केलेल्या गावांनाही त्यांच्या रुपाने प्रथमच महापौर पद मिळाले आहे. आज सकाळी  भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवडचे दैवत मानल्या जाणा-या  संत मोरया गोसावी यांचे दर्शन घतले. यावेळी सर्वांनी केशरी फेटे घालून महिला नगरसेवकांनीही हिरव्या रंगाच्या साड्या  व फेटे घालून महापालिकेत प्रवेश केला. यावेळी आमदार  महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, नगरसेवक नामदेव ढाके, राहुल जाधव यांनी बैलगाडी मध्ये बसून महापालिकेत प्रवेश केला.

यावेळी सभागृहात भाजपचे, राष्ट्रवादीचे शिवसेना, मनसे तसेच अपक्ष उमेदवारही हजर होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षातर्फे महापौर पदासाठी अर्ज भरलेल्या शाम लांडे यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.  मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापौर पदाची सर्व सूत्रे यावेळी नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांना  दिली.

पदभार स्विकारल्यानंतर महापौर काळजे यांनी  सर्वसाधारण सभा 23 मार्च राजी दुपारी 2 पर्यंत तहकूब केली. त्यानंतर महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत महापौर व उपमहापौर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांचा परिचय – 


नितीन काळजे यांच्या जन्म 10 मार्च 1974 चा असून त्यांचे वय 42 वर्ष आहे. त्यांचा अद्यापर्यंत विवाह न झाल्याने ते पिंपरी-चिंचवडचे पहिले अविवाहित महापौर ठरणार आहेत. ते दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा व्यवसाय शेती असून त्यांचा विट कारखाना, वाहतूक, बिल्डींग मटेरिअल सप्लायर असे विविध व्यवसाय आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 31 वर्षाच्या इतिहासात नितीन काळजे हे पहिले अविवाहित महापौर ठरले आहेत. नितीन काळजे यांची ही दुसरी नगरसेवकपदाची टर्म आहे. 2012 सालीही त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर नगरसेवकपद मिळवले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी 2017 ओबीसी जागेवरून प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवली होती.
यावेळी सर्वच नवनिर्वाचित  नगरसेवकांच्या स्वागतासाठी उद्यान विभागातर्फे महापालिकेमध्ये फुलांची रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.

"kajle0"

 

"kalje02"

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.