‘डिपेक्स’द्वारे घडणार विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान सृजनशीलतेचे व नवनिर्मितीचे दर्शन

पिंपरीच्या एचए मैदानावर 17 ते 20 मार्च दरम्यान भव्य प्रदर्शन

राज्यभरातील विद्यार्थी सादर करणार 270 अभियांत्रिकी प्रकल्प

 

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने पिंपरीतील एचए मैदानावर 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान सृजनशीलतेचे व नवनिर्मितीचे दर्शन घडणार आहे. हे प्रदर्शनाचे 28 वे वर्ष असून पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रदर्शन प्रथमच होत आहे. 

अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री राम सातपुते, डिपेक्स स्वागत समितीचे सचिव दीपक पांचाळ व डिपेक्सच्या निमंत्रक प्रा. सरिता बलशेटवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एचए मैदानावरील डिपेक्सच्या प्रांगणाचे डॉ. एपीजे अब्दुल कलामनगर असे नामकरण करण्यात आले आहे. डिपेक्सचे उद्घाटन 17 मार्चला (शुक्रवारी) संध्यकाळी सहा वाजता संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधन व विकास अस्थापनेचे संचालक डॉ. व्ही. व्ही. परळीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाचा समारोेप व पारितोषिक वितरण समारंभ 20 मार्चला (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छगनभाई पटेल उपस्थित राहणार आहेत.


डिपेक्ससारख्या माध्यमातूनच उद्योग उभा करण्याची प्रेरणा मिळते. ज्ञान, शील आणि एकता या तीन तत्वांवर भर देऊन डिपेक्स आणि सील यासारखे उपक्रम घेतले जातात. त्यामुळे संशोधकांचे एकत्रीकरण डिपेक्सच्या माध्यमातून होणार असून प्रत्येक स्टॉलमध्ये नाविन्यता बघायला मिळणार आहे. कल्पकता आणि नाविन्यता यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. डिपेक्ससाठी सुमारे 800 प्रकल्प आले होते. त्यापैकी निवडक 270 प्रकल्प प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. त्यात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, रेफ्रिजरेशन, इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल पॉवर, टेलिकम्युनिकेशन्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, केमिकल इंजिनिअरिंग, नॉन कन्व्हेशनल एनर्जी रिसोर्सेस, सिव्हील इंजिनिअरिंग, शोध आणि इंडस्ट्री स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट्स आदी विषयांवरील नावीन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. चार दिवसांत सुमारे 50 हजार विद्यार्थी व 50 हजार नागरिक असे सुमारे एक लाखपेक्षा अधिक जण प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज आहे.

यात प्रकल्पांबरोबरच काही परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले असून त्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. 18 मार्चला (शनिवारी) सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत ‘लव्ह भारत, सर्व्ह भारत’ या विषयावरील परिसंवाद होणार आहेत. दुपारी तीन ते साडेचार दरम्यान ‘प्रथम’ या भारतीय बनावटीच्या संशोधन उपग्रहाविषयी परिसंवाद होणार असून त्यात मुंबई आयआयटीची प्रथम टीम सहभागी होणार आहे. 19 मार्चला (रविवारी) सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत स्टार्ट अप इंडिया या विषयावरील परिसंवादात नवी दिल्ली येथील स्टुडंट स्टार्ट अप समितीचे अध्यक्ष संजय इनामदार मार्गदर्शन करणार आहेत.  दुपारी तीन ते साडेचार दरम्यान संरक्षण क्षेत्रातील संधी या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यास डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. 20 मार्चला (सोमवार) इन्स्टिट्युशनल बिल्डिंग फॉर नॅशनल रिसर्जन्स या विषयावरील परिसंवादात मुंबई आयआयटीचे प्रा. आशिष पांडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभेल.

डिपेक्स हा उपक्रम अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठा उपक्रम असून 1986 पासून डिपेक्स प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षातील मुलांचे प्रकल्प डिपेक्समध्ये सादर केले जातात. यंदाचे 28 वे वर्ष आहे. प्रदर्शन आणि स्पर्धा ही डिपेक्सची संकल्पना आहे. प्रदर्शनामध्ये विविध स्पर्धा घेण्यात येतात. 17 मार्चला सायंकाळी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. 18, 19 मार्चला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भेटी असणार आहेत. 20 मार्चला पारितोषिक वितरण होणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त विद्यार्थी, नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अभाविपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, प्रदेश मंत्री राम सातपुते, डिपेक्स 2017 च्या स्वागत समितीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, सचिव दीपक पांचाळ, सृजन ट्रस्टचे अध्यक्ष राम भोगले, सचिव श्याम अर्जुनवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभाविपचे पिंपरी-चिंचवड शहर मंत्री नकुल वाजे व सर्व  कार्यकर्ते प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.