दर्शन अॅकॅडमीतील चिमुकल्यांनीही सेलिब्रेट केला ‘ग्रॅज्युएशन डे’

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील दर्शन अॅकॅडमीच्या  चिमुकल्यांनी आज (शनिवारी) हवेत टोप्या उडवत तिसरा ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेट केला. यावेळी विद्यार्थ्यांनी कोट व टोपी असा पदवीग्रहणाचा पूर्ण पोशाख परिधान करून त्यांच्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या पदव्या मिळवल्या.

पूर्व प्राथमिक (नर्सरी ते के.जी.) वर्गातून प्राथमिक वर्गात प्रवेश करण्यापूर्वी पूर्व प्राथमिक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले म्हणून या चिमुकल्यांचा आज पदवीग्रहण अर्थात ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. यावेळी सीनियर के.जी. उत्तीर्ण 34 चिमुकल्यांना या कार्यक्रमातून पदवी देण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन कोल्हे, प्रमुख समन्वयक बबिता नायर, सोनल आरेकर, विद्यार्थी, शिक्षक व पालक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनी करण्यात आली. त्यानंतर चिमुकल्यांनी उपस्थित पालकांना कविता अगदी हावभाव करत म्हणून दाखवल्या. तर काहींनी आपल्या भावनाही यावेळी भाषणातून व्यक्त केल्या. त्यानंतर मुख्याध्यापक सचिन कोल्हे, प्रमुख समन्वयक बबीता नायर, सोनल आरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी बोलतना मुख्याध्यापक कोल्हे म्हणाले की, दर्शन अॅकॅडमी केवळ शाळा नसून ते आमचे कुटुंब आहे. एका कुटुंबाप्रमाणे आम्ही मुलांची काळजी घेतो. येथे मुलांना केवळ विद्यार्थी म्हणून शालेय शिक्षण दिले जात नाही तर आमच्या माध्यमातून आम्ही एक चांगली व्यक्ती घडवत असतो. जी समाजात पुढे एक शांतता दूत म्हणून काम करेल. यासाठी त्यांना आम्ही आत्तापासूनच शालेय शिक्षणाबरोबर संताचे विचार, योगा, ध्यान-धारणा आदींचेही शिक्षण देत असतो. एवढेच नाही तर त्यासाठी आम्ही स्वतःही या बाबी अंगीकारतो, कारण मुले शाळेतील शिक्षकांचे अनुकरण करत असतात. त्यासाठी आम्ही छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांच्यावर संस्कार करत असतो.

यावेळी पालकांनाही त्यांच्या भावना व्यक्त करताना त्यांच्या पाल्याची शिक्षणाबरोबरच विचार किंवा वागण्यात झालेली प्रगती, शाळेत घेतले जाणारे विविध उपक्रम आदींचे कौतुक करत पाल्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता कोरडे व नयना पांढरे यांनी केले तर आभार अनिता  कोरडे यांनी मानले.  या कार्यक्रमात खास पालक व विद्यार्थ्यांसाठी सेल्फी कॉर्नरही तयार करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.