शिंदेशाही पगडी चंदनउटी दर्शनास भाविकांची आळंदी मंदिरात गर्दी

गांधी परिवाराने साकारले श्रींचे राजबिंडे वैभवी रूप

 

एमपीसी न्यूज – श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्रींचे राजबिंडे रूप शिंदेशाही पगडी अवतारातील वैभवी रूप गांधी परिवाराने परिश्रम पूर्वक साकारले. श्रींचे लक्षवेधी रूप पाहण्यासह व श्रींच्या दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली. आळंदी परिसरात श्री रामजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात ठिकठिकाणी साजरा झाला.

 

माउली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गुढी पाडव्यापासून श्रींच्या समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास सुरुवात होते. रामनवमीनिमित्त श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पुष्पसजावट करून श्रींचे वैभवी रूप श्रीक्षेत्रामध्ये श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, सुधीर गांधी व गांधी परिवाराने चंदनउटीतून परिश्रम पूर्वक साकारले.

 

दरम्यान, तत्पूर्वी कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. विश्वास नांगरे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी आळंदी मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी त्यांचे स्वागत करून देवस्थानच्या वतीने सत्कार केला.

 

आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थानच्या प्रथेप्रमाणे मंदिरात रामनवमीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले. रामनवमीनिमित्त माउली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत रामजन्मोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. यात मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, चोपदार यांचे वतीने गुढी पूजन झाले. दरम्यान, रामनवमीनिमित्त श्रींची महापूजा बंद ठेवण्यात आली होत्या. उटीनिमित्त भाविकांना श्रींच्या पादुका दर्शन कारंजा मंडपात सुरु होते. उटी नंतर दर्शनास पंखा मंडपात सुरुवात झाली. यानंतर सहाच्या सुमारास चंदन उटी दर्शन खुले झाले.

 

श्री रामजन्मोत्सवानिमित्त श्रींना वैभवी पोशाख करण्यात आला. विना मंडपात मानकरी संतोष मोझे यांच्या वतीने निंबाळकर महाराज यांची कीर्तन सेवा झाली. जन्मोत्सव कीर्तन-पाळणा, आरती, महानैवेद्य, सुंठवडा प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. जन्मोत्सवनंतर श्रींचे दर्शन खुले करण्यात आले. दुपारीअडीचच्या सुमारास श्रींना वैभवी शिंदेशाही चंदन उटीनिमित गाभारा भाविकांना दर्शनास बंद करून कारंजा मंडपात श्रींच्या पादुका दर्शन सुरू करण्यात आले.

 

प्रथेप्रमाणे माउलीचे संजीवन समाधीवर गांधी परिवाराने चंदन उटीतील शिंदेशाही पगडीतील वैभवी राजबिंडे आकर्षक रूप साकारत पूजा बांधली. विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि पुष्प सजावट, फलार्पण करीत श्रीचे रूप लक्षवेधी राहिल्याने भाविकांनी आपल्या नेत्रात साठविले. श्रींच्या दर्शनास भाविकांनी गर्दी केली. नित्यनैमित्तिक प्रवचन सेवा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने झाली. मानकरी यांना देवस्थानतर्फे नारळ प्रसाद देण्यात आला. आवेकर-भावे श्रीराम मंदिर संस्थांनच्या वतीने उत्साहात श्री रामाची पालखी माउली मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा झाली. श्री राम पालखीचे मंदिरात स्वागत करून नारळ प्रसाद देण्यात आला. श्रींना धुपारती झाल्यानंतर रात्री मानकरी संतोष मोझे यांच्या वतीने जागर झाला. मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रींचे चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, श्रीधर सरनाईक, संजय लवांडे, संजय रणदिवे, सोमनाथ लवंगे, महेश गोखले आदींनी मंदिरातील तसेच भाविकांचे दर्शनाचे नियोजन केले.

 

आळंदीत रामजन्मोत्सव उत्साहात साजरा


येथील आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थानच्या श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवास प्रथा परंपरांचे पालन करीत राम नवमी वार्षिक उत्सव साजरा झाला. या निमित्त गुढी पाडवा ते राम नवमी या कालावधीत (दि. 28 मार्च ते 4 एप्रिल ) विविध धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. यात ह.भ.प.मकरंदबुवा करंबेळकर यांची नारदीय कीर्तन सेवा झाली. भजन, गीत रामायण, भजन संध्या, कथा-कथन, श्रीच्या जन्मोत्सवाचे कीर्तन मकरंदबुवा करंबेळकर यांचे झाले. रामनवमीनिमित्त श्रीराम पालखी नगर प्रदक्षिणा झाली. या दरम्यान माउली मंदिरात श्रींच्या पालखीचे आगमन आणि स्वागत झाले. मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. न्यू. अमरज्योत मित्र मंडळाच्या वतीने कुऱ्हाडे आळीत श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. रामजन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. महाप्रसादास भाविकांनी गर्दी करून लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.