अवघ्या 17 दिवसात पुणे-नवी दिल्ली-वाघा बॉर्डर हा 2126 किमीचा सायकल प्रवास पूर्ण

पिंपरी-चिंचवड शहरातील दोन युवकांची कामगिरी

 

एमपीसी न्यूज – कधी थंड हवा, कधी कडक उन्हाचा तडाखा तर कधी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सहन करत पिंपरी-चिंचवड शहरातील सागर वाडकर आणि अभय फटांगरे या युवकांनी पुणे-नवी दिल्ली-अटारी बॉर्डर (वाघा बॉर्डर) असा 2126 किलोमीटरचा प्रवास सायकलने अवघ्या 17 दिवसात पूर्ण केला आहे. या मोहिमेदरम्यान त्यांनी वाटेतील शहरांमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ’  या  योजनेबद्दल जनजागृती केली.

 

अभय हे उद्योजक असून सागर वाडकर हे एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डिझाइन इंजीनिअर आहेत. निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूह येथून 26 फेब्रुवारीला त्यांनी आपल्या  ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृती यात्रेला सुरुवात केली होती. 15 मार्चला ते अटारी बॉर्डर (वाघा बॉर्डर) ला पोहोचले. ते म्हणतात की अनेक योजना व विकास कार्यक्रम सरकारकडून सुरू आहेत. पण दुर्गम भागातील मुलींना हे फायदे मिळत नाही आणि आताही त्या जुन्या काळातील शिक्षणपद्धती आणि जीवन जगत आहेत. ग्रामीण भागातील मुलींनाही चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांच्या पालकांमध्ये या योजनेविषयी जागरुकता करणे गरजेचे आहे.

 

अभय म्हणाले की, आम्ही “रोज पहाटे 5 वाजता प्रवास सुरु करत होतो. सतत बदलणारे हवामान, कडक ऊन, सोसाट्याचा वारा आणि खराब रस्त्यांवर टायर सारखे पंक्चर होणे यांना तोंड देत रोज 110 ती 150 किलोमीटरचा प्रवास करत होतो. ज्याठिकाणी मुक्काम असे तेथील लोकांना या योजनेविषयी माहिती देत होतो. ठाणे, सुरत, उदयपूर, जयपूर, शहापुरा आणि नवी दिल्ली येथील लोकांनी सायकल मोहिमेचे कौतुक केले. शुभेच्छा दिल्या आणि रात्री राहण्याची सोयही केली.

 

या मोहिमेसाठी ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र फडके यांची आम्हाला मोलाची मदत झाली. राजस्थानमधील वृत्तपत्रांनी आमच्या मोहिमेची चांगली दखल घेतली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यावर जयपूरमध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भेट दिली असता त्यांनी आमच्या मोहिमेचे कौतुक केले. नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आम्हाला सायकलिंग करत असताना पाहिले आणि स्वतःहून त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेऊन गेले. तेथे आमच्या मोहिमेची सविस्तर माहिती घेऊन आम्हाला सर्वतोपरी मदत देऊ केली.

 

सागर म्हणाले की, "गुजरात आणि राजस्थानमधील कडक उन्हामुळे शरीरातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असे. त्यामुळे आम्ही दिवसाला 10 ते 12 लिटर पाणी पीत होतो, जुलाब आणि अपचन यामुळे वडोदऱ्यामध्ये डॉक्टरांकडे जावे लागले होते. तेव्हा डॉक्टरांनी एक दिवसाची सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. जयपूर ते दिल्ली दरम्यान जोरदार पाऊस लागला होता तर  दिल्लीपासून पंजाबपर्यंत एवढी थंडी होती की आम्हाला गरम कपडे विकत घ्यावे लागले.

 

या मोहिमेदरम्यान उत्तरेतील लोकांच्या प्रेमळ वागणुकीचा अनुभव आला. लोक आवर्जून चौकशी करत होते, रात्रीचा मुक्काम आपल्या घरी करण्याचे निमंत्रण देत होते. काही ठिकाणी किरकोळ अपघात झाले, दुखापती झाल्या. डॉक्टरांनी उपचाराचे पैसे घेतले नाही. सायकल दुरुस्त करणाऱ्यानेही पैसे घेतले नाही. इंडो सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष  गजानन खैरे  यांच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणच्या सायकलिंग क्लबच्या सदस्यांची भेट झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.