भुशी धरणावर महिला पर्यटकाची छेड काढीत तिच्या कुटुंबीयांवर हल्ला


एमपीसी न्यूज – वर्षाविहारासाठी भुशी धरणावर आलेल्या ठाणे येथील एका कुटुंबातील मुलीची छेड काढीत चार हुल्लडबाज तरुणांनी अपशब्द वापरीत त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

सचिन तुकाराम शिंदे (वय 22), शरद सखाराम शिंदे (वय 28, दोघेही रा.आंबोली, ता.खेड), महेश अंकुश शिंदे (वय 24, रा.पुणे) आणि गणेश गणपत साबळे (वय 25, रा.साबळेवाडी, ता.खेड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी (रा. नालासोपारा, ठाणे) ही तिचा होणार पती, भाऊ आणि वहिनी यांच्यासह भुशी धरण येथे वर्षाविहारासाठी आली होती. ते भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पाण्यात खेळत असताना मागे बसलेल्या सचिन, शरद, महेश व गणेश या चार  हुल्लडबाज तरुणांनी फिर्यादीसह तिच्या कुटुंबातील व्यक्तींच्या अंगावर मुद्दामून पाणी उडविण्यास सुरुवात केली. याबाबत फिर्यादी तरुणीने सदर हुल्लडबाज तरुणांना तसे करण्याबाबत विचारणा केली असता, त्यापैकी एकाने अश्लील शद्ब वापरत तरुणीची छेड काढली.

यामुळे राग अनावर झालेल्या फिर्यादीने एका तरुणाच्या गालात चापट मारली. त्यानंतर सदर तरुणांनी फिर्यादी आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तींना हाताने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत अश्लील वक्तव्य केले. याबाबत लोणावळा शहर पोलिसांनी भादवी कलम 354, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.