पुणे महापालिका तयार करणार गणेश उत्सवाचे मोबाईल अप्लिकेशन


एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतर्फे यंदा गणेश उत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षा साजरे करत असू हा गणेश उत्सव सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी यंदा गणेश उत्सवाचे मोबाईल अप्लिकेशन तयार करणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर दालनात झालेल्या या परिषदेसाठी आयुक्त कुणालकुमार, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. 

यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका विशेष उपक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती टिळक यांनी दिली. गणेशोत्सवावर आधारित खास थीम सॉंग, लोगो निर्माण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी मोबाईल अप्लिकेशन, फेसबुक, इंस्टाग्राम यांचीही मदत घेऊन प्रसिद्धी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुण्याची परंपरा म्हणून ओळखळून जाणाऱ्या ढोल ताशांचा एकत्रित वादनाचा कार्यक्रम आयोजित करून त्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंदवण्याचाही प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी होणाऱ्या मंडळांच्या स्पर्धांसोबत यंदा वसाहतींसाठीही स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केले. शहराच्या मुख्य मार्गावरून दुचाकींची फेरी काढून सामाजिक संदेश देणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. या वर्षीच्या उत्सवाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून सचिन तेंडुलकरला आणण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी उदघाटन सोहळ्याच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.