Chikhali : संतपीठाची 50 लाखाची तरतूद विद्यार्थी आरोग्यसेवेसाठी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणा-या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’साठी तरतूद करण्यात आलेली पन्नास लाख रुपयाची रक्कम महापालिका शिक्षण विभागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि विमा सेवेसाठी वळविण्यात येणार आहे.

टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तीर्थक्षेत्राचे सानिध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला. या संतपीठ उभारणीला मान्यता मिळाल्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखलीतील 1 हेक्टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्चपदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे.

येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. सुमारे 45 कोटी रुपये इतका खर्च या संतपीठ उभारणीसाठी येणार आहे. या संतपीठाच्या माध्यमातून औद्योगिकनगरीचा ‘संस्कृती जपणारे शहर’ असा उल्लेख केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात होणार आहे. संत विचार, संस्कृती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी, संतपीठ कार्यरत करण्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर कंपनी देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यादृष्टीने या भागातील मुलांना अध्यात्मिक आणि आधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण दिले जाणार असून त्यासाठी सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमांचा स्वीकार करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीत नऊ जणांचे संचालक मंडळ आहे. या संतपीठासाठी सन 2018-19 च्या लेखाशिर्षात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ही रक्कम अद्यापही संतपीठाच्या कामासाठी उपयोगात आणलेली नाही, तसेच यंदाच्या वर्षी ही रक्कम संतपीठासाठी खर्च होणार नसल्यामुळे ही रक्कम महापालिका शिक्षण विभागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य सेवा आणि विमा काढण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. त्यासाठी 50 लाख ही रक्कम शिक्षण विभागातील ‘विविध उपक्रम’ या लेखाशिर्षावर वळविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.