PCMC School : महापालिका शाळांमध्ये 32 क्रीडा शिक्षकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीची (PCMC School ) आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 32 प्राथमिक शाळांमध्ये 32 क्रीडा शिक्षकांची नियुक्ती केली आहे. निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये 24 सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या शाळांचा आणि 8 जल्लोष शिक्षणाचा उपक्रमात अव्वल आलेल्या शाळांचा समावेश आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये निपुण करणे, त्यांच्यातील प्रतिभा ओळखणे आणि लहानपणापासूनच शारीरिक विकासाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे, असेही ते म्हणाले.

या उपक्रमाबाबत माहिती सांगताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, नियुक्त करण्यात आलेल्या क्रीडा शिक्षकांना सांघिक तांत्रिक कौशल्ये, शालेय शिस्त तसेच शारीरिक विकास या मूल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्रीडाविषयक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दलची आवड तसेच क्रीडा शिक्षणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन निर्माण होईल.

या उपक्रमाद्वारे महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत शारीरिक विकासालाही हातभार (PCMC School) लागणार आहे. क्रीडा शिक्षणातील ही गुंतवणूक महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपुर्ण ठरणार असून विद्यार्थ्यांच्या शारिरीक आरोग्यासाठी वेगळा मार्ग महापालिकेने निर्माण केला आहे. त्यातून एक चांगली पिढी घडली जाईल असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

Pune Breaking : धक्कादायक! पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना खोदकामात आढळले ग्रेनेड

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रगतीबरोबरच त्यांच्यातील विविध क्रीडा विषयांमधील क्षमता शोधण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होणार आहे. भविष्याच्या दृष्टीने महापालिका शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये कारकीर्द घडविण्याची आणि सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने काम करत असताना शिक्षक शैक्षणिक जबाबदाऱ्यांमध्ये मग्न असतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा शिक्षणाची आवड तर निर्माण होईलच सोबतच शिक्षकांवरील कामाचा भारही कमी होणार आहे. विशेष क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करून महापालिका अधिक व्यापक आणि संतुलित शिक्षण प्रणालीसाठी मार्ग मोकळा करत असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयाबाबतची प्रतिभाही निर्माण करत आहे, असेही जांभळे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.