पिंपरी-चिंचवडमध्ये ‘नोटा’वर तब्बल 87 हजार मते

पिंपळे-गुरव, सांगवी मध्ये सर्वाधिक ‘नोटा’
 

राजकीय पक्षांनी घेतली ‘नोटा’ची धास्ती 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदारराजाने उमेदवारांना अयोग्य ठरवत तब्बल 87 हजार 773 मते ‘नोटा’ला दिली आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांची ‘नोटा’ची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे. यापुढे राजकीय पक्षांना उमेदवार ठरविताना काळजी घ्यावी लागेल, असे संकेत यातून मिळत आहेत.

निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य नसण्याचा पर्याय म्हणजे ‘नोटा’ अर्थात ‘यांपैकी एकही नाही’ असा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 87 हजार 773  मतदारांनी आपल्या प्रभागातील उमेदवार योग्य नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक हा पैशांचा खेळ असल्याचे स्पष्ट झाले असून महापालिका निवडणूकदेखील याला अपवाद ठरलेली नाही. अशावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आपल्या पसंतीचा नसल्यास मतदारांना ‘नोटा’ बटन दाबता येते. या नोटाचे बटन दाबून पिंपरी-चिंचवडकरांनी नापसंत उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

पिंपळेगुरव, जुनी सांगवीमध्ये सर्वाधिक ‘नोटा’!

पिंपळेगुरव-नवी सांगवी या परिसरात सर्वाधिक मते ‘नोटा’ला मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक 31 मध्ये सर्वाधिक 4332 ‘नोटा’ मते पडली आहेत. येथून भाजपचे तीन उमेदवार आणि अपक्ष नवनाथ जगताप निवडून आले आहेत. त्याखालोखाल सांगवी गावठाण-ढोरेनगर प्रभाग क्रमांक 32 मध्ये 4062’नोटा’ मते पडली आहेत. येथेही भाजपचेच पॅनेल निवडून आले आहे. याव्यतिरिक्त निगडी-प्राधिकरणात 3889 नोट मते पडली आहेत. येथून भाजपचे दोन, राष्ट्रवादी एक आणि शिवसेनेचे एक उमेदवार निवडून आले आहेत. निगडी गावठाण-यमुनानगरमध्ये 3755,  नढेनगर-विजयनगरमध्ये 3649, पिंपळेगुरव-क्रांतीनगर-जवळकरनगरमध्ये 3654, नढेनगर-विजयनगरमध्ये 3649, तर पिंपरीगाव-मिलिंदनगरमध्ये 3646 आणि प्रभाग क्रमांक 30 दापोडी मध्ये 3586 ‘नोटा’ मते पडली आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी ‘नोटा’चा अवंलब करण्यात आला होता. महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ‘नोटा’चा अवलंब करण्यात आला आहे. मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते ‘नोटा’ला दिली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक लढविणा-यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. यापुढे उमेदवार देतानाही राजकीय पक्षांना  काळजी घ्यावी लागेल, असे संकेत यातून मिळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.