Nigdi : अनुभवाचे देणं ज्याच्याकडे असतं, त्याला साहित्य हे पुस्तकातून वाचावं लागत नाही – अनघा मोडक

एमपीसी न्यूज- अनुभवाचे देणं ज्याच्याकडे असतं, त्याला साहित्य हे पुस्तकातून वाचावं लागत नाही. बघणं ही डोळ्याची प्रक्रिया, पाहणं ही मनाची आणि दिसणं ही आत्मतत्वाची प्रक्रिया आहे. सरस्वती ही रसवती करण्याचे काम ईश्वर करतो. बुद्धीचा कागद आणि मनाची लेखणी करावी लागते असे भावपूर्ण मत सुप्रसिद्ध निवेदिका, आरजे अनघा मोडक यांनी व्यक्त केले. दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि अनुष्का स्त्री कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 8 ) प्राधिकरणातील मनोहर वाढोकर सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याचे उद्घाटन अनघा मोडक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. यावेळी नगरसेवक अमित गावडे, शर्मिला महाजन, अभिनेत्री-लेखिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. अनुष्का स्त्री कला मंचातर्फे आयोजित करण्यात येणा-या महिला संमेलनाचे यंदाचे हे बावीसावे वर्ष होते. ‘माझ्या दृष्टिक्षेपातून साहित्याने मला काय दिले’ या विषयी पुढे बोलताना अनघा म्हणाल्या की, एका आघातामुळे माझे डोळे गेले. पण माझ्या आतील नजर त्यापूर्वीच अनेक सुंदर, समृद्ध अनुभवांमुळे तयार झाली होती. लहानपणापासून मिळालेल्या अनेक समृद्ध जाणीवा यावेळी मदतीला आल्या. साहित्य हे कधीच काही शिकवत नाही. तुमची मनोभूमिका कशी आहे हे महत्वाचे असते. आई, वडील, भाऊ, गाव यांचा माझ्या समृद्ध जडणघडणीत खूप मोलाचा वाटा आहे. आलेल्या आघाताने मोडून न पडता कशा पद्धतीने स्वत:ला सक्षम बनवायचे हे अनघा यांनी अत्यंत तरलपणे यावेळी मांडले. त्यांचे ओघवते वक्तृत्व उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन गेले.

या संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात ‘चार सख्य चोवीस’ हा चार मैत्रिणींच्या साहित्याच्या एका धाग्याने बांधलेल्या अभिनव कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. अभिनेत्री, लेखिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी, लेखिका, निवेदिका हर्षदा संजय बोरकर, लेखिका, व्याख्याती निर्मोही फडके आणि ऑडिऑलिजिस्ट, स्पीच थेरपिस्ट सोनाली लोहार यांनी मिळून लिहिलेल्या चार सख्य चोवीस या कथासंग्रहाच्या निर्मितीचा प्रवास मांडला. साहित्याच्या अंगणात नातं मैत्रीपलीकडचं उलगडून दाखवताना या पुस्तकाची निर्मिती कशी झाली हे हलक्याफुलक्या संवादातून व्यक्त केले. वेगवेगळ्या क्षेत्रातील एकमेकींना एकेकाळी अनोळखी असणा-या या चौघीजणी साहित्याच्या एका दुव्याने एकत्र येतात आणि त्याच्या भावभावना व्यक्त करणा-या एका समृद्ध पुस्तकाची निर्मिती कशा पद्धतीने होते ते या चौघींनी आपल्या गप्पातून उपस्थितांसमोर सहजगत्या मांडले. मागील ११ फेब्रुवारीला प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील चॉकलेट या स्वत: लिहिलेल्या कथेचे अभिवाचन संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी केले.

त्यानंतर गायिका धनश्री गणात्रा, लेखक, कवी संदीप अवचट, ब्लॉगलेखक कौस्तुभ केळकर, ब्लॉगलेखिका गौरी ब्रह्मे, अभिनेत्री संयोगिता भावे यांच्या गाणी, गप्पा, कथांचा ‘शब्द, स्वरांच्या हिंदोळ्यावर’ हा कार्यक्रम सादर झाला. सध्याच्या तरुणाईचे आवडते ब्लॉगलेखक कौस्तुभ केळकर यांनी त्यांच्या ‘बिईंग वुमन’ आणि ‘बूट’, ‘नजर’ या समाजमाध्यमावर प्रसिद्ध असलेल्या लघुकथा आणि गौरी ब्रह्मे यांनी ‘ब बायकांचा, ब बडबडीचा’ आणि ‘द बेस्ट शेफ’ या लघुकथांचे अभिवाचन केले. तसेच संदीप अवचट यांनी कविता सादर केल्या. अभिनेत्री संयोगिता भावे यांनी त्यांच्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेतील एक स्वगत अत्यंत प्रभावीपणे सादर केले. तसेच धनश्री गणात्रा यांनी ‘निगाहे मिलानेको जी चाहता है’ ही अत्यंत प्रसिद्ध कव्वाली सादर करुन उपस्थित रसिकांची पसंतीची पावती मिळवली. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या ‘रेशमाच्या रेघांनी’ या लावणीवर उपस्थितांमधील महिलांनी वय विसरुन मनसोक्त ठेका धरला. ‘ए वतन, मेरे वतन आबाद रहे तू’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सिंथेसायझरची समर्पक साथ दीप्ती कुलकर्णी यांनी आणि तबल्याची दमदार साथ विनीत तिकोणकर यांनी केली.

तसेच यावेळी तृषा अमित गावडे यांनी संयोजकांच्या वतीने छोटेखानी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक शर्मिला महाजन यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले, आभार वृंदा गोसावी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.