Chakan : लाकडी घाण्याचे तेल म्हणून खुल्या बाजारातील तेल विकणा-या  कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

दोन लाख 27 हजारांचा खाद्य तेलसाठा जप्त : Action taken by the Food and Drug Administration against a company selling oil

एमपीसी न्यूज – ‘लाकडी घाणा ऑईल’ या नावाने खुल्या बाजारातील तेल घेऊन त्यावर लेबल लाऊन विकल्याच्या संशयावरून अन्न प्रशासन विभागाने एका कंपनीवर कारवाई केली.  या कारवाईमध्ये दोन लाख 27 हजार रुपये किमतीचे खाद्य तेल जप्त करण्यात आले. दरम्यान, कंपनीला व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई 5 ऑगस्ट रोजी मे चाकण ऑईल्स, सदाशिव पेठ -पुणे येथे करण्यात आली.

‘मे चाकण ऑईल्स’ ही कंपनी लाकडी घाणा ऑईल या ट्रेडमार्कच्या नावाने विविध खाद्यतेल बनविणे आणि विक्रीचा व्यवसाय करीत आहे. या कंपनीतील ‘लाकडी घाणा’ मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.

कंपनी खुल्या बाजारातून तेल विकत घेते आणि त्यावर लाकडी घाणा ऑईलचा नाव, पत्ता असलेले लेबल लावत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

तसेच कंपनीमध्ये एकच डबा अनेकदा पॅकिंगसाठी वापर करत असल्याचे निदर्शनास आले. कंपनी लाकडी घाण्यावर तेल उत्पादन करीत नाही, तसेच पॅकिंगसाठी वापरलेले तेल लाकडी घाण्यात तयार केलेले नसल्याने प्रशासनाने कारवाई केली आहे.

प्रत्येक खाद्यतेल उत्पादक, पॅकर, रिपेकर, रिलेबलर यांच्याकडे स्वत:ची इन हाऊस सुसज्ज प्रयोगशाळा असणे आवश्यक व बंधनकारक असतांना संबंधित स्थापनेकडे तशी प्रयोगशाळाच नव्हती.

लेबलवरील लाकडी घाणा ऑईल या शब्दावरुन सर्वसामान्य जनतेचा खाद्यतेल लाकडी घाण्यावर तयार केले असल्याचा समज होवुन त्यांची फसवणूक होत होती.

_MPC_DIR_MPU_II

कंपनीतून भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री होत असल्याच्या संशयावरुन शेंगदाणा तेल, करडई तेल व राईस ब्रॅन तेल या खाद्यतेलाचे नमुने घेवुन त्याचा सुमारे 2 लाख 27 हजार रुपये किंमतीचा सुमारे एक हजार 200 किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या खाद्यतेलाचे तिनही नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीला तिचा सर्व व्यवसाय बंद ठेवण्याबाबत अन्न प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. वरील प्रकारावरून कंपनीने तिच्या लेबलवरील लाकडी घाण्याचे चित्र आणि शब्द काढून टाकण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे ट्रेडमार्क ॲथॉरिटी यांना लेबलवरील मजकुर जनतेची दिशाभूल व फसवणूक करणारा असल्याने संबंधित आस्थापनेचा मंजुर ट्रेडमार्क रद्द करण्यासही प्रशासनाकडून सांगण्यात येणार आहे.

ही कारवाई अन्न प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे, रमाकांत कुलकर्णी, अरुण धुळे, अनिल गवते यांच्या पथकाने केली आहे.

नागरिकांना कोणत्याही अन्न पदार्थांबाबत शंका असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर (1800222365) संपर्क साधण्याचे आवाहन अन्न प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.