Akurdi News: आकुर्डीगावात क्षयरोग केंद्र सुरु करू नका; शिवसेना शहर संघटक बशीर सुतार यांची मागणी

एमपीसी न्यूज – आकुर्डी गावठाण भागातील महापालिकेच्या जुन्या रुग्णालयात  राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण केंद्र सुरु करण्याच्या हालचाली चालू आहेत.  मात्र,  गावठाण भागातील दाट लोकवस्ती आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता आकुर्डीतील जुन्या रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण केंद्र सुरु करण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे.

याबाबत शिवसेना शहर संघटक बशीर सुतार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी केंब्रिज स्कूलचे प्रतिनिधी सचिन ढेरंगे यांच्यासह सलीम शेख, लल्लन खान व अन्य नागरिक उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी आकुर्डी येथील जुन्या रुग्णालयातील सर्व कामकाज नवीन रुग्णालयात सुरु करण्यात आले. त्यामुळे जुन्या रुग्णालयात क्षयरोगाचे कामकाज चालू करण्यात येत आहे. जुने रुग्णालय हे आकुर्डी गावाच्या मध्यवस्तीत आहे. जवळच  बाजारपेठ असून आजूबाजूला मोठमोठ्या सदनिका, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, चर्च, मशीद,  भाजी विक्रेते आणि शिवाय शेजारीच नवीन रुग्णालयाची वास्तू आहे. क्षयरोगाच्या कामकाजामुळे या परिसरातील नागरिक, शाळकरी  मुले, चर्च आणि मशिदीत येणारे  भाविक, बाजारपेठेतील व्यापारी यांच्या आरोग्यवर  परिणाम होऊ शकतो. स्थानिक नागरिकांना क्षय रोगापासून होणारे दुर्धर आजार होण्याचे शक्यता आहे.  त्यामुळे  जुन्या रुग्णालयात क्षयरोगाचे काम करू नये, अशी मागणी सुतार यांनी निवेदनात केली आहे.

वाचनालय किंवा करमणूक केंद्र सुरु करा!

क्षयरोगाचे कामकाज इतर ठिकाणी  करावे व या इमारतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाचनालय व करमणूक केंद्र म्हणजे  कॅरमबोर्ड,  टेबल टेनिस, बुद्धिबळ अशा प्रकारचे इनडोअर खेळ खेळण्यास नागरिकांची सोय करावी. आकुर्डी गावातील नागरिकही  सातत्याने ही मागणी करीत  आहेत. याबाबत बऱ्याच वेळा निवेदन दिले आहे. याचा योग्य विचार करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुतार यांनी केली. त्यावर  सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त पाटील यांनी दिल्याची माहिती सुतार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.