Alandi : प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

एमपीसी न्यूज – प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या ( Alandi) मदतीने पतीचा खून घडवून आणला. खून करून प्रियकर सैन्य दलात नोकरीवर रुजू झाला. तर पत्नीने पतीच्या मृत्यूवर खोटा शोक केला. पण हा प्रकार फार दिवस चालला नाही. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पत्नी, तिचा प्रियकर आणि एका साथीदाराला अटक करत गुन्ह्याची उकल केली.

राहुल सुदाम गाडेकर (वय 36, रा. नऱ्हे आंबेगाव, पुणे) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर (वय 30), तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे (रा. देहूगाव, पुणे) आणि त्याचा मित्र रोहिदास नामदेव सोनवणे (वय 32, रा. चिंचपूर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांना अटक केली आहे.

Maval : मावळ भाजपचे लाभार्थी संपर्क अभियान

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता चिंबळी बर्गेवस्ती ते कुरुळी रोडवर राहुल गाडेकर या व्यक्तीच्या डोक्यात हातोड्याने मारून त्याचा खून केल्याची घटना घडली. राहुल गाडेकर हे चाकण एमआयडीसी मधील फोक्स वॅगन कंपनीत रात्रपाळी ड्युटीसाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आळंदी पोलीस करत होते. गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून देखील करण्यात आला.

पत्नीवर संशयाची सुई

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी सुरुवातीला राहुल काम करत असलेली फोक्स वॅगन कंपनी एमआयडीसी चाकण आणि नऱ्हे आंबेगाव येथे राहत असलेल्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर राहुल यांची पत्नी सुप्रिया हिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात तिच्यावर संशय बळावल्याने तिला ताब्यात घेण्यात आले.

खुनाचे बिंग फुटले

सुप्रिया ही नऱ्हे आंबेगाव येथील नवले हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून काम करत होती. कोरोना काळात तिने निमगाव पागा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे लॅब सुरु केली. लॅबचा व्यवसाय करत असताना तिची ओळख सुरेश पाटोळे याच्यासोबत झाली. सुरेश हा सैन्य दलात नोकरी करत होता. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यावरून राहुल आणि सुप्रिया यांच्यात वाद होऊ लागले. प्रेमात अडथळा ठरत असल्याने सुप्रिया आणि सुरेश यांनी राहुलचा काटा काढण्याचे ठरवले.

खुनाची तयारी केली

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या राहुलचा काटा काढण्याचे ठरले. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये सुरेश सुट्टीवर आला. त्याला राहुलचा खून करण्यासाठी एका साथीदाराची गरज होती. त्यामुळे त्याने त्याच्या आते बहिणीच्या गावी चिंचपूर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे जाऊन त्याचा मित्र रोहिदास सोनवणे याला सोबत घेतले. दोघांनी तिथेच बाजारातून दोन लोखंडी हातोडे घेऊन ठेवले आणि दोघेही आता योग्य वेळेची वाट पाहू लागले. योग्य वेळ कोणती हे त्यांना आरोपी सुप्रिया सांगणार होती.

पैशांची विभागणी

राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयांचा विमा काढला होता. त्यांच्या मृत्युनंतर सुप्रियाला हे पैसे मिळणार होते. त्या पैशांतून ती काही रक्कम आपला प्रियकर सुरेश पाटोळे आणि रोहिदास सोनवणे यांना देणार होती.

पहिल्या प्रयत्नात राहुल बचावले

10 फेब्रुवारी 2024 रोजी राहुल त्यांच्या गावी अकोले, जि. अहमदनगर येथे पत्नीकडे गेले होते. तिथून ते कंपनीत कामासाठी कारमधून येत होते. राहुल घरातून निघताच सुप्रियाने सुरेशला फोन करून माहिती दिली. सुरेश आणि रोहिदास दोघेजण दुचाकीवरून निघाले. पुणे-नाशिक महामार्गावर घारगाव येथे दोघांनी राहुल यांना गाठले. तिथे त्यांच्या कारच्या काचा हातोडीने फोडून त्यांच्यावर खुनी हल्ला केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून राहुल पहिल्या प्रयत्नात बचावले. आपल्यावर कोणी आणि का हल्ला केला, असा प्रश्न त्यांच्या मनात होता. याबाबत त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

Chikhali : शहरातील सोसायट्यांना दुषित पाणीपुरवठा; पालिका म्हणते पाणी जपून वापरा

पुन्हा कट रचला

आपल्यावर हल्ला झाल्याने राहुल पुरते घाबरले. ते काही दिवस घरीच थांबले. मात्र सुप्रियाने राहुल यांना पुन्हा कामावर जाण्यासाठी तगादा लावला. त्यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. त्यामुळे राहुल यांनी वैतागून आठवडाभर कंपनीत रात्रपाळी देण्याबाबत विनंती केली. तसेच कार आणि इतर कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने ते नऱ्हे आंबेगाव येथे न राहता मामाच्या घरी बर्गे वस्ती चिंबळी, ता. खेड येथे राहत होते. तिथून कामावर ये-जा करत असताना रस्त्यात अडवून त्यांना ठार मारण्याचा आरोपींनी पुन्हा कट रचला. त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी रात्री राहुल दुचाकीवरून कामावर जात असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा आरोपींनी खून केला. खून केल्यानंतर रोहिदास त्याच्या गावी गेला. सुरेश हा सुरुवातीला दिल्ली येथे ड्युटीवर गेला. तिथून तो हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी हजर झाला.

मात्र हे बिंग फुटल्यानंतर गुंडा विरोधी पथकाने सुरेश पाटोळे याला हैदराबाद येथून तर त्याचा साथीदार रोहिदास सोनवणे याला त्याच्या घराजवळून ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहिते, तौसीफ शेख, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे ( Alandi) यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.