Asia Cup 2023 : आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार प्रवेश

एमपीसीन्यूज (विवेक कुलकर्णी) :  श्रीलंका संघावर रोमहर्षक विजय मिळवत (Asia Cup 2023) भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दहाव्यांदा प्रवेश केला आहे. कमी धावसंख्या असलेले सामने नेहमीच रोमहर्षक होतात,त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांना आली. भारतीय संघाने श्रीलंका संघावर 41 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला असला तरीही या सामन्यात श्रीलंकन संघाने दाखवलेली झुंजार वृत्तीही चिरकाल लक्षात रहावी अशीच होती. सामना कधीही कोणीही जिंकेल असे वाटत असतानाच रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर आणि त्याला कुलदीप यादवने केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाचा विजयी वारु विजेतेपदाच्या अंतिम सामन्यात शानदाररित्या दाखल झाला आहे. या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आपली कमाल दाखवणाऱ्या श्रीलंका संघाच्या युवा दीमुथ वेल्लालागेला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

 

क्रिकेटमध्ये एक सुभाषित अतिशय प्रचिलीत आहे आणि लोकप्रियही. Cricket is a game of glorious uncertainty,ते का याची प्रचिती आज पुन्हा एकदा सर्वांना आली. ज्या प्रेमदासा मैदानावर काल भारतीय फलंदाजाने धावांची टांकसाळ खोलली होती, त्याच मैदानावर आज तेच सर्व धुरंदर फलंदाज एका 20 वर्षीय युवा पण अतिशय प्रतिभावंत गोलंदाजापुढे धारातीर्थी पडले. केवळ चौथाच श्रीलंकन गोलंदाज ज्याने भारताविरुद्ध एकाच स्पेलमधे 5 बळी मिळवले, तो म्हणजे डावखुरा  फिरकी युवा दुनिथ वेल्लालागे. त्याने आपल्या या अविस्मरणीय स्पेलमध्ये पहिल्या चेंडूवर शुभमन गील तर शेवटच्या चेंडूवर हार्दिक पंड्याला बाद करुन आजचा दिवस आपल्या नावावर केला.

 

त्याआधी सुपर फोर मध्ये पाकिस्तान संघांविरुद्ध दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने आज श्रीलंका संघांविरुद्ध खेळताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पण थोड्याच वेळात हा निर्णय चुकला असे वाटायला लागले. याला कारणीभूत ठरला तो युवा वेल्लालागे. आजच्या सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना धार्जिण (Asia Cup 2023) ठरेल असे वाटत होतेच,म्हणूनच भारतीय कर्णधार रोहितने अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला अंतीम संघात स्थान दिले. खरे तर भारतीय संघाची सुरुवात आजही चांगलीच झाली होती. सलग दोन शतकी सलामी भागीदारी देणाऱ्या गील,रोहित जोडीने आजही पहिल्या गड्यासाठी 80 धावांची शानदार सलामी दिली. ही जोडी सलग तिसऱ्या वेळेस शतकी भागीदारी देणार असे खात्रीपूर्वक वाटत असतानाच लंकन कर्णधार शनाकाने 12 व्या षटकात वेल्लालागेला गोलंदाजी दिली ,आणि त्याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच अप्रतिम चेंडूवर गीलला चकवत भारतीय संघाविरुद्ध आपली पहिली विकेट मिळवली. हा चेंडू कुठल्याही गोलंदाजासाठी अतिशय अविस्मरणीय असा होता. गीलसारख्या प्रतिभावंत आणि जम बसलेल्या फलंदाजालाही त्या चेंडूने चकवले आणि चेंडू त्याचा अभेद बचाव भेदून त्याला त्रिफळाबाद करुन गेला.

Talegaon Dabhade : कलापिनी बालभवनची पारंपारिक दहीहंडी व पुस्तक हंडी उत्साहात साजरी

 

तो बाद झाल्यानंतर खेळायला आला  तो पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त खेळी करुन सर्वांच्या ओठावर आपल्या नावाची चर्चा आणणारा विराट कोहली. त्याचा आत्मविश्वास सातवे आसमानपर असाच होता पण वेल्लालागेने त्यालाही केवळ 3 धावांवर असताना शनाकाच्या हातून झेलबाद करवले. या दोन विकेट्सच्या पतनानंतरही कर्णधार रोहित आपले सलग तिसरे अर्धशतक करून स्थिरावलाय असे वाटत होते, पण वेल्लालागेने त्यालाही वैयक्तिक 53 धावांवर त्रिफळाबाद करुन भारतीय संघाला फार मोठा धक्का दिला.

 

रोहितने 48 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकार मारत या धावा केल्याच, पण याचबरोबर त्याने आजच्या सामन्यात आपल्या 10000 धावा पूर्ण करुन असा पराक्रम करणारा सहावा भारतीय असा बहुमानही पटकावला. त्याने केवळ 241 इंनिंग खेळून असा पराक्रम केला,पण त्याच्या विकेटमुळे बिनबाद 80 वरून भारतीय संघाची अवस्था 3 बाद 91 अशी झाली. या कठीण प्रसंगी (Asia Cup 2023) कालच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध  आपले 6 वे शतक पूर्ण करुन भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा दुसरा विजयी शिलेदार के एल राहुल आणि युवा ईशान किशन ही जोडी एकत्र आली.

 

ईशान किशन धावांसाठी झगडत असताना राहुल मात्र आत्मविश्वासपुर्ण खेळत होता.या जोडीने 89 चेंडूत अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली आशा दाखवली खरी, पण इतक्यावेळ संयमाने खेळत असलेल्या किशनचा संयम नेमका याचवेळी सुटला आणि आपल्यावर आलेल्या दडपणाला झुगारून देण्याच्या प्रयत्नात तो मिडऑफला उभ्या असलेल्या वेल्लालागेच्या हातात असलंकाच्या गोलंदाजीवर 61 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला. दुसऱ्या बाजूने उत्तम खेळत असलेल्या राहूललाही वेल्लालागेने 39 धावांवर असताना आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत आपला चौथा गडी मिळवत भारतीय संघाला पुरते अडचणीत आणले.

 

यानंतर पंड्यालाही आपल्या स्पेलच्या अखेरच्या चेंडूवर यष्टीमागे बाद करवत आपली पहिली पाच विकेट्स मिळवण्याची स्वप्नवत कामगिरी पुर्ण केली.खरतर पंचाने पंड्याला नाबाद दिले होते, आणि कर्णधार शनाका डिआरएस साठी फारसा उत्सुक दिसतही नव्हता, पण ऐनवेळी त्याने डीआरएस घेतला आणि त्यात पंड्या बाद झाल्याचे सिद्ध होताच वेल्लालागेचा आनंद गगनात मावत नव्हता. असलंकानेही या खेळपट्टीचा अप्रतिम फायदा उठवत भारतीय फलंदाजांना चांगलेच  परेशान केले.

Pimpri : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पिता पुत्र गंभीर जखमी

 

त्यानंतर  भारतीय संघ 200 धावा तरी करेल हा यक्षप्रश्न भेडसावत असताना भारतीय संघाने 197 धावा जोडल्या, पण तेवढ्यात या स्पर्धेत सतत खेळाचा बेरंग करणाऱ्या पावसाचे आगमन झाले,यावेळेस भारतीय संघाची 47 षटकानंतर 9 बाद 197 अशी धावसंख्या होती ,पावसाने उघडीप घेतल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला आणि अक्षर पटेलच्या प्रयत्नामुळे भारतीय संघाने 213 धावा फलकावर लावण्यात यश मिळवले.लंकन संघाकडून फिरकी गोलंदाजांनी 9 विकेट्स मिळवल्या तर अखेरची विकेट तिक्षणाने मिळवली.

 

या खतरनाक खेळपट्टीवर या धावा कमी नव्हत्या खरे तर,पण पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर खेळपट्टीचा रागरंग काहीसा बदललाय असे वाटत होते,त्यातच सलग तेरा सामने जिंकलेल्या श्रीलंका संघाचा आत्मविश्वासही जोरातच होता, त्यामुळे भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. दीमुथ करूनारत्ने आणि पथुन निसंका यांनी श्रीलंकन डावाची सुरुवात केली,तर भारतीय (Asia Cup 2023)आक्रमणाची सुरुवात बुमराहने.पहिल्या षटकात 7 धावा गेल्यानंतर सिराजने दुसरे षटक निर्धाव टाकले,तिसरा षटकात मात्र बुमराहने एका अप्रतिम स्विंगवर निसंकाला चकवले आणि राहुलनेही यष्टीमागे एक अप्रतिम झेल घेत भारतीय संघाला पाहिले यश मिळवून दिले.

 

त्यानंतर खेळायला आला तो कुशल मेंडीस.त्याने आल्यापासूनच आक्रमक अंदाजात खेळायला सुरुवात केली पण हीच आक्रमकता त्याला नडली आणि बुमराहनेच त्याला सुर्यकुमारच्या हातून झेलबाद करुन भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. पाठोपाठ सिराजनेही धावा साठी झुंजत असलेल्या करुनारत्नेला गीलच्या हातून बाद केले आणि श्रीलंका संघाची अवस्था 8 षटकात 3 बाद 25 अशी करून टाकली.यानंतर खेळायला आला तो समरविक्रमा. श्रीलंका संघातला तो फिरकीला उत्तमरित्या खेळणारा खेळाडू मानला जातो. त्याने असलंकाला चांगली साथ देत डाव सावरायला सुरुवात केली,यावेळी नशीबही श्रीलंकन संघाच्या बाजूने होते,भारतीय खेळाडूंनी काही झेल सोडले.ही जोडी स्थिरावलीय असे वाटत असतानाच कुलदीपने समरविक्रमाला आधी आणि नंतर थोड्याच वेळात असलंकाला राहूलच्याच हातून बाद करून श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवून दिला.

 

यानंतर धनंजय डिसिल्वा आणि कर्णधार शनाका ही अखेरची अनुभवी अन विश्वासू जोडी मैदानात होती.ही जोडी कितपत लढत देईल यावरच श्रीलंका संघाच्या विजयाचे सर्व काही समीकरण अवलंबून होते, पण केवळ 26 धावांची भर पडलेली असतानाच जडेजाने शनाकाला बाद करुन ही जोडी फोडली.शनाकाचा शानदार झेल रोहितने घेतला. याचसोबत जडेजाने आशियाकप स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक 23 विकेट्स मिळवून इरफान पठाणच्या 22 बळीच्या विक्रमाला मागे टाकले.

Today’s Horoscope 13 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

भारतीय संघाच्या विजयाची औपचारिकताच बाकी आहे असे वाटत होते, मात्र गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या वेल्लालागेनी फलंदाजीतही चांगलीच चमक दाखवत धनंजय डिसिल्वासोबत नाबाद अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाचे दडपण चांगलेच वाढवले होते. 63 धावांची बहुमोल भागीदारी झालेली असताना अखेर जडेजाने आपली कमाल दाखवत जम बसलेल्या डिसिल्वाला गीलच्या हातुन झेलबाद करून ही जोडी तोडली.ही जडेजाची 199वी एकदिवसीय सामन्यातही विकेट.त्यानंतर पंड्याने तिक्षणाला बाद करुन विजय दोन पावलावर आणला,पण वेल्लालागे अप्रतिम खेळत होता, केवळ 20 वर्ष वयात त्याने दाखवलेली प्रगल्भता बघून त्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे हे कळत होते. त्याने भारतीय संघाला चांगलेच मेटाकुटीला आणले खरे,पण कुलदीप यादवने अखेरचा घाव घालत तीन चेंडूत दोन गडी बाद करुन भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.अन याचबरोबर त्याने आपल्या 150 विकेट्स पूर्ण करून आणखी एक मैलाचा दगडही गाठला आहे. युवा वेल्लालागे 42 धावा काढून नाबाद राहिला.

 

भारतीय संघ या विजयाने दहाव्यांदा आशियाकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आणि आतापर्यंत भारतीय संघाने 7 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहेच. भारतीय संघाचा (Asia Cup 2023) आणखी एक सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे, त्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देवून सुर्यकुमार,तिलक वर्मा, शमीला संधी मिळेल का हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.  तर 14 तारखेला होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघातल्या सामन्यातल्या विजेत्यासोबत भारतीय संघ जेतेपदासाठी लढेल.

 

संक्षिप्त धावफलक

भारत 49.1 षटकात सर्वबाद 213

रोहित 53,राहुल 39,ईशान 31,गील 19,अक्षर 26

वेल्लालागे 40/5,असलंका 18/4,तिक्षणा 41/1

विजयी विरुद्ध

श्रीलंका

41.3 षटकात सर्वबाद 172

मेंडीस 15,समरविक्रमा 17,असलंका 22,शनाका 9,धनंजय डिसिल्वा41 ,वेल्लालागे नाबाद 42

कुलदीप 43/4,बुमराह 30/2,जडेजा 33/2,सिराज 17/1,पंड्या 14/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.