Asia cup 2023 – आशिया कप मधल्या सुपर फोरच्या तिसऱ्या सामन्यात आजही पावसाने केला रंगाचा बेरंग

भारतीय संघाच्या 24.1 षटकात 2 बाद 147 धावा

एमपीसीन्यूज : (विवेक दि. कुलकर्णी) अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष्य लागून राहीलेल्या आशिया कप मधल्या सुपर फोरच्या तिसऱ्या अन हायव्होल्टेज सामन्यात आजही पावसाने रंगाचा बेरंग केल्याने आजचा सामनाही रद्द करण्यात आला,पण खुषखबरी हीच आहे की उद्याचा दिवस हा या सामन्यासाठी राखीव ठेवला असल्याने सामना उद्या पुन्हा सुरु होईल. आजच्या दिवसाचा खेळ पावसामुळे जेंव्हा रद्द करण्यात आला तेंव्हा भारतीय संघाने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या,उद्या याच धावसंख्येपासून खेळ पुढे सुरू केला जाईल.

Maharashtra News : व्यापाऱ्यांना थकबाकीतून मुक्ती देणारी राज्यकर विभागाची नवी अभय योजना २०२३

आशियाकप 2023 च्या सुपर फोरमधल्या तिसऱ्या सामन्याला आज कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर सुरुवात झाली ज्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले पण भारतीय संघाच्या सलामी जोडीने जबरदस्त सुरुवात करुन देताना बाबरला चांगलेच अडचणीत आणले.

रोहित शर्मा आणि शुभमन गील जोडीने शानदार फलंदाजी करत संघाचीअर्धशतकी भागीदारी 50 चेंडूंत पूर्ण केली.त्यात गीलचा वाटा होता 39 धावांचा, ज्या आल्या होत्या 27 चेंडूत ज्यात होते खणखणीत 9 चौकार.या सुंदर फटकेबाजीमुळे पहिल्या पॉवरप्ले अखेर भारतीय संघाने 10 षटकात 61 धावा चोपल्या होत्या आणि दोन्हीही सलामीवीर नाबाद होते.

याचसामन्यात गीलने भारतीय संघातर्फे सर्वात वेगाने 1000 धावा काढल्या,ज्या केवळ 19 सामन्यात आल्या.याचबरोबर त्याने सर्वाधिक 1403 धावा याच वर्षांत ठोकून हा विक्रमही आपल्या नावावर केला.हाच धडाका त्याने पुढेही चालू ठेवला आणि थोड्याच वेळात आपले एकूण 8 वे आणि पाकिस्तानविरुद्धचे पहिले अर्धशतक केवळ 37 चेंडूत पूर्ण केले.

त्याला इतका वेळ संयमाने साथ देणाऱ्या रोहीतनेही मग गियर बदलत आपला दर्जा दाखवताना षटकार ठोकून आपले अर्धशतक पुर्ण केले, जे केवळ 42 चेंडूतच आले.हे त्याचे एकूण 50 वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी अर्धशतक. खास बाब म्हणजे षटकार मारत आपली आजची खेळी सुरु करणाऱ्या रोहितने नंतरच्या 27 चेंडूंत 11 धावा केल्या होत्या, पण त्याने अशा चिरपरिचित शैलीत फटकेबाजी सुरु केल्याने अन या जोडीने असा धडाका लावल्याने भारतीय संघाचे शतक 80 चेंडूतच आले.

ही सलग दुसरी शतकी भागीदारी ठरली या जोडीची. तसेच दोन्हीही सलामीवीरांनी सलग दोन अर्धशतक पूर्ण करून भारतीय संघाच्या मिशन वर्ल्डकप साठी जणू काही शुभसंकेतच दिला आहे. अर्थात या खेळीत गीलला दोन वेळा जीवदान मिळाले पण खेळात अशी संधी मिळाल्यावर त्याचा फायदा अशा फलंदाजांनी उचलला नाही तरच नवल.हा धडाका चालू असतानाच ड्रिंक्सब्रेक झाला आणि त्यानंतरच्या पहिल्याच षटकात रोहितचा हुकलेला फटका ज्याचे एका अप्रतिम झेलात फहीम अश्रफने करून भारतीय संघाला पहिला झटका दिला.

रोहितला त्याआधी बऱ्यापैकी महागड्या ठरलेल्या शादाबने बाद केले.रोहितने 49 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत 56 धावा केल्या. तो बाद होताच मैदानावर आला तो कोहली,त्याने गीलला साथ द्यायला सुरुवात केलीच होती की दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी आलेल्या शाहीन आफ्रिदीने गीलला वैयक्तिक 58धावा वर बाद करुन आधी झालेले नुकसान काही प्रमाणात कमी करुन आपले उट्टे काढले. गीलने आफ्रिदीला जबरदस्त नामोहरम करत आधी चांगलेच फोडून काढले होते, पण आफ्रिदीने त्याला बाद करुन पाकीस्तान संघाला दुसरे मोठे यश मिळवून दिले.

यानंतर मैदानात उतरला तो दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन करणारा के एल राहुल.त्याने आज आत्मविश्वास दाखवत चांगली सुरुवात केली, त्याने आज आपल्या एकदिवशीय सामन्यातल्या 2000 धावा पुर्ण केल्या, ज्या 45 सामन्यात आल्या.ही जोडी सावधगिरी दाखवत खेळत होती तोच पावसाने आज सामन्यात पहिल्यांदा व्यत्यय आणला. त्यानंतर पंचानी वेळोवेळी मैदानाचे निरीक्षण केल्यानंतर अखेर रात्री 9 वाजता आज खेळ होणार नाही असे जाहीर केले,उद्या पुन्हा खेळ सुरू होईल तेंव्हा भारतीय संघ आपल्या डावाची सुरुवात दोन बाद 146 धावांवर पुढे सुरू होईल.

संक्षिप्त धावफलक
भारत 24.1 षटकात 2 बाद 146
रोहित 56,गील 58,राहूल नाबाद 17,कोहली नाबाद 8
शादाब 45/1,शाहीन 37/1

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.