एमपीसी न्यूज : : (विवेक दि. कुलकर्णी) पावसाने आणलेला अडथळा, त्याने सामन्यात उत्पन्न केलेले संकट अशा त्रासदायक गोष्टींनी आणलेल्या बाधा भारतीय संघाच्या जबरदस्त इच्छेपुढे तकलादू पडल्या आणि हैदराबाद एक्सप्रेस मोहम्मद सिराजच्या स्वप्नवत स्पेलपुढे रोहित शर्माच्या भारतीय संघाने जबरदस्त विजय मिळवत लंकादहन करून आठव्यांदा आशिया कप जिंकून मिशन विश्वकपच्या आधीच्या स्पर्धेत विजयी श्रीगणेशा करुन भारतीय समर्थकांना बाप्पाच्या आगमनाआधीच सुखाची बातमी देवून आनंदी आनंद साजरा करण्याची दिली दिली. भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा मोहम्मद सिराज सामन्याचा मानकरी ठरला.तर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा कुलदीप यादव मालिकेचा मानकरी ठरला.
https://www.youtube.com/shorts/Qm3U7npQ5Bk
मोहम्मद सिराजने आपल्याला मिळालेले बक्षीस मैदान सामन्यासा प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूल बनवणाऱ्या सर्व स्टाफला देवून आपल्या मनाचा मोठेपणा आणि खिलाडूवृत्तीचेही शानदार प्रदर्शन केले.याआधी सर्वाधिक 7 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या भारत आणि 5 वेळा विजेता असणाऱ्या सहआयोजक(म्हणायला) श्रीलंका या दोन संघादरम्यान झालेल्या आजच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अतिशय शानदार खेळ करत आठव्यांदा ही स्पर्धा जिंकून आपल्या समर्थकांना आज लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीच सुखाची वार्ता देवून मिशन विश्वकप स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघ पूर्णपणे तयार असल्याचा इशारा क्रिकेटविश्वाला दिला आहे.
आज दुपारी सामना सुरू होण्यापूर्वी काही काळ पावसाने आपली मनमानी गाजवत सामन्यावर काही काळ अनिश्चिततेचे संकट आणले खरे,पण जिद्दीने आणि विजीगिशु वृ त्तीने खेळणाऱ्या भारतीय संघाच्या मनोनिग्रहापुढे पावसानेही हार मानली आणि नंतरच्या दोन अडीच तासात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत श्रीलंका संघाला दहा गडी आणि 33.5 षटके राखून दणदणीत मात देत आशिया कप स्पर्धेतले आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीच्या सामन्यात अकराव्या वेळेस अंतिम फेरीत(10 एकदिवसीय, एक टी-20) दाखल झालेल्या श्रीलंका संघांची भिडंत ही स्पर्धा याआधी 7 वेळा जिंकणाऱ्या आणि 10 वेळा अंतीम फेरीत दाखल झालेल्या भारतीय संघाविरुद्ध होती . नाणेफेकीचा कौल श्रीलंका संघाचा कर्णधार दशून शनाकाच्या बाजूने लागला खरा, पण नंतरच्या संपूर्ण खेळावर एकाच संघाचा वरचष्मा होता ,तो म्हणजे भारतीय संघाच्या कर्णधार रोहितच्या टीम इंडियाचा.
दशून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय किती आत्मघातकी होता हेच सिद्ध करत मोहम्मद सिराजने आपल्या छोट्या कारकिर्दीत केलेल्या एका अविस्मरणीय स्पेल मुळे त्याला आणि अवघ्या क्रिकेट विश्वाला पुढील काहीच मिनिटात उमगले. खरेतर याची सुरूवात केली जसप्रीत बुमराहने,जसे श्रीरामाने रावणदहन करण्याआधी हनुमानाने केलेल्या लंकादहनासारखे.श्रीलंका संघाच्या डावाची सुरुवात होताच तिसऱ्याच चेंडूवर त्याने कुशल परेराला एका अप्रतिम स्विंगवर चकवले आणि उरलेल्या नाममात्र कर्तव्याला के एल राहुलने डोळ्याची पापणी लवण्याआधीच पुर्ण करत श्रीलंका संघाला पहिला मोठा धक्का दिला,पण हे काहीच नाही असे वाटले असेल श्रीलंका संघाला तेंव्हा ,जेव्हा हैदराबाद एक्सप्रेस ऊर्फ मिया मॅजिकने आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवले.
सामन्याच्या चौथ्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्याच षटकात सिराजने श्रीलंका संघाला सुनामी ची आठवण करुन देणारी दाहक गोलंदाजी करत त्याने श्रीलंका संघाला संकटाच्या खोल खाईत ढकलले. केवळ दुर्दैवाने त्याची हॅट्ट्रिक झाली नाही पण त्याहूनही मोठी कामगिरी करत त्याने या षटकात चार गडी बाद करत श्रीलंका संघाच्या पराभवावर आणि भारतीय संघाच्या आठव्या विजेतेपदावर जणू शिक्कामोर्तबच केले.सिराजने अतिशय भेदक गोलंदाजी करत श्रीलंका संघाच्या पराभवाची वाटच मोकळी केली.
सिराजने आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम आणि भेदक गोलंदाजी केली, त्याने केवळ 21 धावा देत सहा बळी मिळवले.याचसामन्यात त्याने आपल्या एकदिवसीय सामन्यातल्या 50 विकेट्स पुर्ण केल्या ,तर आजच्या सामन्यातल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आपल्या कारकीर्दत पहिल्यांदाच 5 विकेट्सही मिळवून आपली कारकीर्द शानदारच असेल याचा इशाराही क्रिकेटविश्वाला दिला.आज त्याला पंड्यानेही तोलामोलाची साथ देत केवळ 3 धावा देत 3 बळी मिळवले.हैदराबाद शहरात एका अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या पण आपल्या असामान्य कर्तृत्वाने अल्पावधीतच महान बनलेल्या मोहम्मद सिराजचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
सामान्य वा असामान्य कुटुंबात जन्म घेणे हे कोणाच्याही हातात नसते,पण कोठेही जन्म मिळाल्यानंतर आपल्या कर्तृत्वाने आपल्या जीवनाला असामान्य बनवणारेच खऱ्या अर्थाने किती आणि कसे महान ठरतात,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मोहम्मद सिराज. त्याने आज केलेली भेदक गोलंदाजी आणि असामान्य कामगिरी पूढील कित्येक दशके फक्त भारतीयच नव्हे तर जगभरातल्या सच्चा क्रिकेटरसिकांच्या ओठी अजरामर असेल ,यात तीळमात्र शंका नाही.सिराज आणि पंड्याच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंका संघाचा डाव केवळ 50 धावांवरच संपुष्टात आला.
खरे तर 6 बाद 12 नंतर श्रीलंका संघ इतक्या धावा करेल का अशीच आशंका होता, पण मेंडीस आणि हेमंथाच्या कृपेने कसेबसे श्रीलंका संघाने 50 धावा तरी धावफलकावर दाखवण्यात यश मिळवले,पण या स्पर्धेत जबरदस्त जोशात असलेल्या(अपवाद बांगलादेश विरुद्धचा पराभव)भारतीय संघासाठी हे आव्हान जराही आव्हान नव्हतेच,तेच सिद्ध करत नवीन सलामी जोडी ,गील आणि ईशान किशनने केवळ 37 चेंडूंतच विजयाला गवसणी घालत भारतीय संघाला दहा गडी आणि तब्बल 33.5 षटके राखून सर्वात मोठा विजय मिळवून दिला.ईशान ने 18 चेंडूंत 23 तर गीलने 19 चेंडूत 6 चौकार मारत नाबाद 27 धावा करत भारतीय संघाला आशिया कप जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला.
भारतीय संघासाठी हा विजय अनेक अर्थाने मोठा आहे. द्विपक्षीय मालिका जिंकणारा भारतीय संघ इतर स्पर्धेत बऱ्याचदा अशी कामगिरी करु शकत नाही ,या आरोपाला याविजयाने खोटे ठरवले आहे, तर या धडक विजयाने भारतीय संघाच्या मिशनविश्वकप मोहीमेलाही मोठे बळ मिळणार आहे. एकंदरीतच हा विजय क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांना खुप आनंद देणारा असाच आहे,आता अशीच दैदिप्यमान कामगिरी येत्या विश्वकप स्पर्धेत होवो आणि भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वकप स्पर्धा जिंको,यापेक्षा वेगळी अपेक्षा कुठल्याही भारतीय क्रिकेट प्रेक्षकांची नसेल ,नाही का?
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका
15.2 षटकात सर्वबाद 50
मेंडीस 17,वेल्लालागे 8,हेमंथा 13
पंड्या 3/3,बुमराह 23/1,सिराज 7-1-21-6
पराभूत विरुद्ध
भारत
6.1 षटकात बिनबाद 51
ईशान नाबाद 23,गील नाबाद 27