Pune : भारतीय संस्कृती आणि अभिजात कलांचा शिक्षणपद्धतीत समावेश असावा : डॉ. प्रभा अत्रे

गानवर्धन, तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे पंडित केशव गिंडे यांचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज : भारतीय म्हणून आम्ही आमची ओळख विसरत चाललो आहोत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पैसा, मौज-मजा, मनोरंजन म्हणजे यशस्वी जीवन असा समज जनमानसात रूढ होत आहे. आजची सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हेच माध्यम प्रभावी ठरणार आहे. त्यासाठी भारतीय संस्कृती आणि अभिजात कला असा (Pune) मुलभूत अभ्यासक्रम आपल्या शिक्षणपद्धतीत असणे अत्यंत आवश्यक आहे. सुसंस्कृत आणि सुशिक्षित नागरिक होण्यासाठी या शिक्षणाचा नक्की उपयोग होईल, असे प्रतिपादन पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभाताई अत्रे यांनी केले. या शिक्षणातून संवेदनशील, जबाबदार समाज तसेच संगीताच्या क्षेत्रासाठी एक चांगला श्रोता निर्माण होऊ शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Asia Cup 2023 : सिराज आणि पंड्याने केले लंकादहन

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी गेली 44 वर्षे सातत्याने कार्य करणारी गानवर्धन संस्था व तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने ज्येष्ठ बारसीवादक, संशोधक, विचारवंत पंडित केशव गिंडे यांना आज (दि. 17) डॉ. अत्रे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. टिळक स्मारक मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चाणक्य मंडळाचे संस्थापक, प्रसिद्ध शैक्षणिक विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, सचिव रवींद्र दुर्वे, तात्यासाहेब नातू फाउंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू व्यासपीठावर होते. मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, ग्रंथ आणि 50 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. अत्रे पुढे म्हणाल्या, मौज-मजा, मनोरंजन अशा काळात कलाकारांच्या संयमाची आणि जाणकार श्रोत्यांच्या अंकुशाची मुख्य गरज आहे. शास्त्रीय संगीताचा आजचा खरा आश्रयदाता हा सामान्य माणूस आहे. त्याची आवड-समज योग्य तऱ्हेने जोपासण्याची जबाबदारी आम्हा कलाकारांवर आहे. पंडित केशव गिंडे हे फक्त उत्तम कलाकाराच नव्हे तर बासरीवादनात नवीन शक्यता निर्माण करण्याच्या क्षेत्रात त्यांचे खूप मोठे कार्य आहे. या कार्याने स्वरगान करण्यासाठी तीन सप्तकापेक्षाही अधिक जागा निर्माण झाली आहे. कलाप्रस्तुतीमध्ये वेगवेगळ्या शक्यता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे कलाकार अपघातानेच आढळतात. संगीताच्या विकासात अशा तऱ्हेच्या प्रयोगांचा खूप मोठा वाटा असतो.

मी आजही तरुण आहे..
माझ्या वाढदिवसाची तारीख लक्षात ठेवून गानवर्धन संस्था या पुरस्काराचे नियोजन करते या वेळी आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची अनमोल भेट मला मिळत असते. मला या क्षेत्रात अजून खूप वाटचाल करायची आहे, त्यासाठी आपल्या सोबतीचे बळ मला मिळते त्यामुळे मी आजही तरुण आहे, अशा भावना डॉ. प्रभा अत्रे यांनी या वेळी व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना पंडित गिंडे म्हणाले, स्वरयोगिनी पद्वविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते त्यांच्याच नावाचा पुरस्कार मला मिळतो आहे हे महत्‌‍भाग्य आहे. या पुरस्काराची रक्कम पुढील संगीत कार्यासाठी मी समर्पित करीत आहे. गुरू, आई-वडिल, शिष्य यांच्यामुळेच मी माझ्या क्षेत्रात कार्य करू शकलो आहे.

गानवर्धनची यशाकडे वाटचाल अखंडितपणे सुरू राहिल अशा शुभेच्छा देत अविनाश धर्माधिकारी म्हणाले, हा एका परिवाराचा हृद्य सोहळा आहे. डॉ. अत्रे आणि पंडित गिंडे यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या क्षेत्रात उत्तम कार्य घडो.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित केशव गिंडे आणि शिष्यांचे बासरीवादन झाले. सुरुवातीस पंडित गिंडे यांनी केशव वेणू, अनाहत वेणू अशा विविध स्वरूपातील बासरी या वाद्याची माहिती दिली. बासरी या वाद्याविषयी केलेल्या संशोधनाचे थोडक्यात दर्शन घडविले. त्यानंतर मैफलीची सुरुवात राग यमनने केली. धवल जोशी, डॉ. आशुतोष जातेगावकर, प्रकाश बेहरे, अझरुद्दिन शेख, आदित्य पवार, सुनील गंडेवार यांनी बासरीवादन केले तर तुकाराम जाधव यांनी तबला साथ केली.

गानवर्धन संस्था आणि स्वरमयी गुरुकुलतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात गानवर्धन संस्थेच्या उपक्रम व विविध पुरस्कारांविषयी सविस्तर माहिती दिली. मानपत्राचे वाचन कोषाध्यक्ष सविता हर्षे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार दयानंद घोटकर आणि शारंग नातू यांनी केला. डॉ. प्रभा अत्रे यांचा सन्मान अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची घोटकर यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.