Bahinabai Chaudhari : बहिणाबाई चौधरी – स्त्री जीवनाचा ठाव घेणाऱ्या कवयित्री

एमपीसी न्यूज – आपल्या सहजसोप्या बोलीभाषेतून जीवनाचे (Bahinabai Chaudhari) तत्त्वज्ञान सांगणाऱ्या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी .आज ( 15 ऑक्टोबर ) बहिणाबाई चौधरींची पुण्यतिथि  आहे. त्या निमित्ताने त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.   

 

बहिणाबाई चौधरी खानदेशातील (Bahinabai Chaudhari) एक अजरामर कवयित्री. जळगाव शहरापासून अवघ्या 6 की. मी अंतरावर  असलेल्या आसोदा या छोट्याशा गावात जन्मलेल्या बहिणाबाई.  “माझी माय सरसोती, माले शिकवते बोली, लेक बहिनाच्या मनी  किती गुपित पेरली” असे म्हणणाऱ्या, लौकिक दृष्ट्या शालेय जीवनाचा अनुभव न घेताही जीवनाचे सार आपल्या कवितेतून उलगडणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी. आज खानदेशातील  विद्यापीठ “ कवयित्री  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ” या नावाने सुरू आहे हीच त्यांची पदवी म्हणावी लागेल.

आसोदे गावातील प्रतिष्ठित महाजन घराण्यात 1880  साली नागपंचमीला  बहिणाबाई यांचा जन्म झाला. वडील उखाजी व आई भिमाई. स्वातंत्र्यपूर्वीचा  तो काळ, वयाच्या तेराव्या वर्षीच जळगांवातील  नथूजी चौधरी  यांच्याशी त्याचा विवाह झाला. पण दुर्दैवाने तारुण्यातच वैधव्य  आल्याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागेल. पण त्याही परिस्थितीत घरातील , शेतीतील काम सांभाळत आपल्या मुलांना योग्य संस्कारनी त्यांनी संस्कारित केले. प्रसिद्ध कवी सोपान चौधरी हे त्यांचे पुत्र होय.

Ghatasthapana : आजपासून नवरात्रीला सुरुवात…जाणून घेऊया घटस्थापनेबद्दल…

 

स्वातंत्र्यपूर्व काळात  स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता तो  म्हणजे काव्याचा. पूर्वी महिला घरातील विविध कामे करताना, दळण  दळताना अभंग, ओव्या , चारोळ्या इ. गात कामे करीत असत त्यातूनच मराठी साहित्यात अभंग, ओव्या, बोली भाषेतील लोकगीत इ. मोठे साहित्य निर्माण झालेले दिसते. ही परंपरा नुसतीच जुनी नसून अनुभवांनी समृद्ध अशी आहे. यात स्त्री जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ही रचनाचा समावेश मोठ्या प्रमाणात सर्वच कवी, कवियत्री यांनी केलेला दिसतो.   बहिणाबाई चौधरी यांच्या ही अहिराणी भाषेतील अनेक कविता  स्त्री मनाचा, भावनांचा,  जीवनाचा वेध घेणाऱ्या आहेत.

“अरे संसार संसार जसा तवा चुलहयावर

आधी हाताले चटके तव्हा मिळते भाकर”

सुख दुख:च्या ऊन सावली  नंतरच सुख समाधानाची प्राप्ती होते हे जीवनाचे (Bahinabai Chaudhari) तत्वज्ञान बहिणाबाई आपल्या कवितेतून  सांगतात.  स्त्री जीवनातील अनेक पैलू स्त्रीचे हळवे मन, माहेरची ओढ, सासरचे वातावरण, सासुरवासी  महिलाच्या मनातील भावना अहिराणी बोली भाषेत त्या सहज मांडतात. स्त्रीला माहेरची ओढ सदैव लागलेली असतेच . हीच माहेरची ओढ आपल्याला बहिणाबाईच्याही अनेक कवितांतून जाणवते. माहेरला जाताना सर्व भान हरपले जाते हे सांगताना त्या म्हणतात –

लागे पायाला चटके, रस्ता तापीसनी लाल,

माझ्या माहेराची वाट, माले वाटे मखमल”

स्त्रीचे एक मन माहेरी आणि एक मन सासरी असते अशा या मनाला झोकयाची उपमा त्या देतात.

“गेला झोका  गेला झोका चालला माहेराले जी,

आला झोका आला झोका पलट सासराले जी”

माहेरच्या / मैत्रिणींच्या  आठवणीत रमणारी एक  मैत्रीण  आखाजी ला (अक्षय तृतीया खानदेशात हा  सण  माहेरवासी महिलांचा सण  म्हणून साजरा केला जातो. झोके खेळणे परंपरा आहे) पुन्हा  कधी भेटणार हे कवितेतून  त्या  विचारतात –

“सन सरे आस उरे आखाजी  गेली व्हयी  जी,

   सांग सई सांग सई आखाजी आता कही जी ?”

पुन्हा  कधी आपण भेटणार? कधी मन मोकळे बोलणार अशी मैत्रिणींच्या मनाची  हुरहूर मांडताना

संसारी कामात बुडालेल्या  सासुरवाशीणीच्या  कष्टना  त्या ढोराची उपमा देताना  दिसतात.

“उठ सासुरवाशिण बाई उठ जान शेती,

कामाचा किती घोर, तू गोठयातील ढोर”

हे कितीही सत्य असले तरी माहेरची आठवण काढत सासरचे सर्व दु:ख  तू सहन कर असे ही त्या सांगायला विसारत  नाहीत. माहेर विषयी बोलताना तितक्याच सहजतेने त्या सासरचे, सासरच्या माणसांचे ही वर्णन करतात –

खटल्याची घरामधी, देखा माझी सग्गी सासू,
सदा पोटामधी माया तसे डोयामधी आसू ”

बहिणाबाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन (Bahinabai Chaudhari) जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते. सहज, सरळ  बोलीभाषे मुळे या कविता हृदयाला भिडतात. त्यांनी कवितेतून दिलेल्या उपमा अगदी चपखल आहेत. माणसाचे चंचल मन कसे आहे हे सांगताना  त्या म्हणतात

“मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोरं,

किती हाकला हाकला फिरी येते पिकांवर ”

सुगरणीच्या खोप्याचं उदाहरण देऊन बहिणाबाई माणसांना सुंदर संदेश देऊन जातात –

अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला”

 

सुगरणी सारखा इवलासा जीव आपल्या पिलांसाठी किती सुंदर घरटं बनवते मग माणसाने का करून दाखवू नये. अशा  अनेक ओव्यातून जीवन तत्वज्ञान बहिणाबाई चौधरी यांनी मांडलेले आहे. मराठी साहित्यात बहिणाबाईच्या कविताना अनन्य  साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.  आज अनेक लोक बहिणाबाई यांचे कविता  विषयांवर  संशोधन करतांना (Bahinabai Chaudhari)  दिसतात.

 

लेखिका – सौ. अपर्णा नागेश पाटील

                   ९८२३७६६६४४

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.