Bavdhan : बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू

एमपीसी न्यूज – वन्य प्राण्यांचे स्थलांतर, देखभाल, उपचार नियोजनाची व्यवस्था व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून (बावधन Bavdhan) येथील वन्यप्राणी उपचार केंद्राच्या कामास प्रत्यक्षात सूरूवात झाल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Bhimashankar News : बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे – मुख्यमंत्री यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

देखभाल व उपचार नियोजनासाठी वन्यप्राणी या विषयात तज्ज्ञ असणाऱ्या 3 संस्थांनी मुख्य वन संरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीसमोर सादरीकरण केले. समितीने दिलेल्या गुणांच्या अनुषंगाने रेस्क्यू (आरइएसक्यू) धर्मादाय ट्रस्ट, पूणे या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राची देखभाल व उपचार नियोजन व्यवस्था करण्याकरिता संस्थेसोबत करार करून केंद्राचे हस्तांतरण करण्यात आले आहे.

संस्थेचे प्रतिनिधी, वनविभागाचे कर्मचारी व वास्तू सल्लागार यांनी सामाईक पाहणी करून वन्यप्राणी उपचार केंद्र वन्य प्राण्यांचे स्थलांतर करण्याकरिता काही बाबींची पूर्तता आवश्यक असल्याचे कळविले होते. त्यानुसार आवश्यक बाबींची पुर्तता करून 7 सप्टेंबरपासून वन्यप्राणी उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकूण 138 वन्यप्राणी व पक्ष्यांवर याठिकाणी उपचार सुरु आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे वन्यप्राणी उपचार केंद्र असून जखमी अथवा मानवी वस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या 1926 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केले आहे.

या प्राण्यांवर होणार उपचार

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) रस्त्यावर बावधन येथे 22 एकरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि आधुनिक वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात 400 वन्य प्राण्यांवर उपचाराची सोय असल्याने हे केंद्र पुणे विभागात सर्वात मोठे वन्य प्राण्यांचे हॉस्पिटल ठरले आहे. रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसणे, मानवी हल्ल्यात स्वबचाव करताना जखमी होणे, अन्न-पाणी न मिळाल्याने अशक्तपणा येणे, आजारी पडणे, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणे, कायमस्वरूपी अपंगत्व येणे, मांजामध्ये कापले जाणे, विजेचा धक्का बसणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जखमी झालेले वन्यप्राणी या केंद्रात आणले जाणार आहेत. त्यांच्यावर उपचार करून जे प्राणी निसर्गात राहण्यासाठी सक्षम असतील त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

सध्या अशा जखमी प्राण्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले जात आहेत. जुन्नरमधील बिबट्यांसाठी वन विभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्र काही वर्षांपूर्वी सुरु केले आहे. तिथे केवळ बिबट्यावरच उपचार केले जातात. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राणी बचाव केंद्र, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय आणि रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्टचे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर या संस्थांमध्ये जखमी प्राण्यांवर उपचार केले जात होते.

वन्यप्राणी उपचार केंद्रातील विभाग
प्रशासकीय इमारत
पशुवैद्यकीय रुग्णालय
मार्जार कुळातील प्राणी
कुत्रावर्गीय प्राणी
तृणभक्षी वन्यप्राणी
सस्तन प्राणी
सरपटणारे प्राणी
पक्षी विभाग
वन्यप्राणी शवविच्छेदन कक्ष

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.