Bhosari : मौजमजेसाठी पर्स हिसकावणारे दोन महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी महिलांची पर्स हिसकावणा-या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी भोसरी येथून सुनीता शशिकांत कुलकर्णी या 63 वर्षीय महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी हिसकावली होती. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. चोरी करणारी दोन्ही मुले अल्पवयीन आहेत.

पर्स चोरणा-या मुलांनी मौज मजा आणि राइस प्लेट खाण्यासाठी हा उपद्वयाप केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दोन्ही अल्पवयीन आरोपी हे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. हे दोघे मित्र असून त्यांना मौजमजा आणि राइस प्लेट खाण्याची आवड होती. खिशात पैसे नव्हते म्हणून त्यांनी चोरी करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी ज्येष्ठ महिलेची पर्स दुचाकीवरून येऊन हिसकावली. त्यामध्ये 160 रुपये आणि दोन मोबाईल फोन होते. त्यातील एक साधा फोन 50 रुपये आणि स्मार्टफोन 5 हजार रुपयात विकला. ज्या मित्राला स्मार्ट फोन विकला होता त्याने एमपीएससीची तयारी करत असलेल्या तरुणाला 7 हजार रुपयांना मोबाईल विकला.

भोसरी पोलिसांचा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे मोबाईलचा तपास सुरु होता. एमपीएससीची तयारी करत असलेल्या तरुणाने मोबाईल सुरु केला. त्यावेळी पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोबाइल आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी देखील जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.