Bhosari News: ‘अंकुशभाऊंचे आमदारकीचे अधुरे स्वप्न रविभाऊच पूर्ण करणार’

समर्थकांना ठाम विश्वास; वाढदिवसानिमित्त भोसरीतील फलकबाजीची जोरदार चर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भाजप रुजविणारे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे सख्खे पुतणे आणि भोसरीमधून बिनविरोध विजयी झालेले भाजपचे नगरसेवक रवि लांडगे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे…. त्यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी भोसरी मतदारसंघात जोरदार फलकबाजी केली आहे.

‘भोसरी विधानसभेचे नेतृत्व, भावी आमदार’, ‘आता वेळ बदलणार’, भोसरीचा विकास पाहणाऱ्या अंकुशभाऊंच्या विचारांचा वारसा… भोसरीकरांचे चैतन्यमूर्त” असे फलक झळकले आहेत. अंकुशभाऊंचे आमदारकीचे अधुरे स्वप्न रविभाऊच पूर्ण करणार असा ठाम विश्वास समर्थकांना वाटत असून फलकबाजीतून तो व्यक्त केला आहे. या फलकबाजीची भोसरी विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत ज्येष्ठ नेते आझम पानसरे, दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्यासह रवि लांडगे हे तिघे बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. अंकुश लांडगे यांचा वारसा रवि चालवितात. पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना अंकुश लांडगे यांनी भाजपचा झेंडा फडकवत ठेवला. शहरात भाजपचे संघटन रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. भोसरीच्या तळ्यात अंकुश लांडगे यांनी कमळ फुलवत अनेक नगरसेवकांना निवडून आणले. भोसरीत भाजपचे वर्चस्व आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध करुन दाखविले. अंकुश लांडगे यांचे आमदार होण्याचे स्वप्न होते. पण, ते अधुरे राहिले.

मनमिळावू स्वभवाच्या अंकुश लांडगे यांचा मोठा चाहता वर्ग होता. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आली पण ती पाहण्यासाठी अंकुश लांडगे नाहीत. त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रवि लांडगे प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. अंकुश लांडगे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत रवि लांडगे भोसरी परिसरात काम करत असून जनतेची सेवा करत आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही रवि यांनी काम केले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत बिनविरोध येऊन रवि यांनी भाजपचे खाते खोलले. त्यानंतर भाजपची एकहाती सत्ता आली. मागील साडेचार वर्षात जनतेशी बांधिलकी ठेवत नगरसेवक म्हणून रवि यांनी चुकीच्या कामांना प्रखरपणे विरोध केला. वेळप्रसंगी पक्षाच्या आमदारांना आव्हान देत चुकीच्या कामे रोखली. महापालिकेच्या भोसरी हॉस्पिटलचे होऊ घातलेले खासगीकरण रवि यांच्या आंदोलनामुळेच थांबले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. रवि यांनी जनतेशी बांधिलकी ठेवत चुकीची कामे हाणून पाडली. त्याचा फटका त्यांना बसला. मागील साडेचारवर्षांत त्यांना एकही पद मिळाले नाही. पण, संघर्षाचा वारसा असलेल्या रवि यांनी त्यांची तमा बाळगली नाही.

पक्षाचे निष्ठावान, बिनविरोध निवडून आलेले असतानाही रवि यांना महत्त्वाचे पद मिळाले नाही. शेवटच्या वर्षांत त्यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली. शहरात भाजप रुजविणाऱ्या अंकुश लांडगे यांचा वारसा चालविणाऱ्या रवि यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन भाजपकडून अंकुश लांडगे यांचा सन्मान केला जाईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु, भविष्यात विधानसभेला अडसर होऊ नये यासाठी रवि यांना शेवटच्या क्षणी डावलले. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या रवि यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

अनेक जण दबावतंत्रासाठी राजीनामे देतात आणि परत माघार घेतात. मागील साडेचार वर्षांत हे शहरवासीयांनी वारंवार पाहिले. पण, रवि राजीनाम्यावर ठाम राहिले. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि नंतर सहा महिने झाले. तरी, ते एकदाही स्थायीच्या सभेला हजर राहिले नाहीत. शब्दावर ठाम राहणारा कार्यकर्ता, शांत स्वभाव अशी ओळख असलेल्या रवि यांना भविष्यकाळात राजकारणात मोठी संधी दिसत आहे. रवि यांचे चुलते अंकुश लांडगे यांचे आमदार होण्याचे स्वप्न होते. पण, ते पूर्ण झाले नाही. आता अंकशु लांडगे यांचे स्वप्न त्यांचे पुतणे रवि पूर्ण करतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे. फलकांच्या माध्यमातून त्यांनी विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे रवि हे अंकशु लांडगे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाढदिवसाच्या फलकांमध्ये ‘आता वेळ बदलणार’ असा मजकूर टाकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेतही त्यांच्या समर्थकांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पुन्हा नव्याने दमाने रवि तयारी करण्याची शक्यता आहे. उभरते नेतृत्व असलेले रवि भोसरीच्या विद्यमान आमदारांना आव्हान देवू शकतील अशी परिस्थिती सध्यातरी दिसत आहे. महापालिका निवडणुकीत भोसरीतून राष्ट्रवादीचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणून भाजप आमदरांना धक्का देण्याचे नियोजन केले जात आहे. महापालिकेला घायाळ करायचे आणि विधानसभेला ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचा असे सूत्र त्यांच्याकडून अवलंबविले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी ‘इंटेरस्टिंग’ असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.