Bhosari news: कौटुंबिक कौतुकाने शिवसैनिक भारावले ; प्लाझ्मा दान करणा-या कार्यकर्त्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – दुष्काळ असो, महापूर असो किंवा महामारी असो, अशा कोणत्याही संकटकाळात किंवा आपत्तीत मदतीला धावून जाण्यात शिवसैनिकच पुढे असतो. कोरोना महामारीतही कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्यात आणि सर्वसामान्य रूग्णांचे बील कमी करण्यात शिवसैनिकांनी पुढाकार घेतला, याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, अशा शब्दात शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसैनिकांची प्रशंसा केली. घरातूनच झालेल्या या कौतुकाने शिवसैनिक भारावून गेले.

शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आणि युवा सेनेचे अ‍ॅड. कुणाल तापकीर यांच्या माध्यमातून प्लाझ्मा दान करण्यासाठी आणि रूग्णालयांकडून आकारण्यात येणा-या जादा बिलासंदर्भात सोशल मिडीयावर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे.

या माध्यमातून तब्बल 55 रूग्णांचे प्रत्येकी तीन लाखापर्यंतचे बील शिवसेनेच्या दणक्यामुळे कमी करण्यात आले. तसेच 150 रूग्णांना प्लाझ्मा दान करण्यात आला.

शिवसेना भोसरी विधानसभेच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीत धनंजय आल्हाट आणि अ‍ॅड. कुणाल तापकीर यांच्या कार्याचे खास कौतुक करत त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त पदाधिका-यांनाही सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख माऊली कटके, महिला आघाडी जिल्हा संघटीका सुलभा उबाळे, जिल्हा उपप्रमुख नीलेश मुटके, विधानसभा संघटक तुषार सहाणे, रावसाहेब थोरात, जिल्हा समन्वयक राहुल भोसले, विधानसभा समन्वयक अंकुश जगदाळे, सर्जेराव भोसले, परशुराम आल्हाट, शहर उपप्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, युवा अधिकारी सचिन सानप, स्मिता जगदाळे, शशिकला उभे आदी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपेक्षित काम शिवसेना भोसरी विधानसभेच्या माध्यमातून होत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी मतदार यादीवर बारकाईने काम करावे. गटप्रमुखांची बांधणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

धनंजय आल्हाट यांनी प्रास्ताविक केले. राजु भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. राहुल गवळी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.