Bhosari crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्यास मारहाण, रिक्षाची तोडफोड

भोसरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

0

एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्याने चार जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला मारहाण केली. तसेच रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पवारवस्ती, दापोडी येथे घडली. भोसरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

नरेश मनेश वाल्मिकी (वय 20), आकाश राजू वाल्मिकी (वय 19), स्वप्नील सुरेश भोई (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांसह चौथा साथीदार सागर वाल्मिकी (सर्व रा. दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास पांडुरंग शेलगे (वय 36, रा. पवारवस्ती, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेलगे मालवाहतूक रिक्षा (एमएच 14 / इएम 2018) चालवतात. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास शेलगे भाजी विक्री करून घरी आले. त्यांनी घराजवळ रिक्षा पार्क केला आणि घरी जाऊ लागले. त्यावेळी आरोपी तिथे आले.

आरोपींनी शेलगे यांच्याकडे दारू प्यायला पैसे मागितले. शेलगे यांनी आरोपींना पैसे दिले नाहीत. या कारणावरून आरोपी नरेश याने लोखंडी रॉडने रिक्षाच्या काचा फोडल्या. आकाश याने रिक्षाचा मागील हौद चेंबवून नुकसान केले.

आरोपी स्वप्नील आणि सागर या दोघांनी शेलगे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. शेलगे यांच्या खिशातून 1 हजार 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.