Pune News : पुणे पोलिसांना मोठा झटका; टोळीप्रमुख म्हणून मोक्कानुसार कारवाई केलेल्या व्यक्तीला जामीन

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी मागील वर्षभरात 60 हुन अधिक मोक्कानुसार कारवाया केल्या आहेत. अनेक गुंडांना तुरुंगात धाडले आहे. तरीही पुणे पोलिसांना झटका देणारा एक निकाल कोर्टाने दिला आहे. मोक्कानुसार टोळी प्रमुख म्हणून अटक केलेल्या व्यक्तीला जामीन देण्यात आलाय. गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ताडीचे रसायन बाळगल्याप्रकरणी मोक्कानुसार अटक केलेल्या टोळी प्रमुखाला जामीन मंजूर केला आहे.

प्रल्हाद उर्फ परेश भंडारी असे जामीन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने एडवोकेट सुरेश वि जाधव, एडवोकेट मतीन शेख आणि एडवोकेट मनीषा खाडे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता.

या गुन्ह्यात मोक्का लागू होत नाही. त्याने कोणताही गुन्हा केलेला नसून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. कोणत्याही टोळीसोबत त्याचा संबंध असल्याचा पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार सत्र न्यायाधीश एस आर नावंदर यांनी हा आदेश दिला.

लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती येथे 24 ऑगस्ट 2021 रोजी पोलिसांनी ताडी बनविण्याचे दोनशे लिटर रसायन जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींवर मोक्का लावण्यात आला होता. त्यामध्ये प्रल्हाद परेश भंडारी यांचाही समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.