Chakan : बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा करून घेणे हाच संशोधनाचा केंद्रबिंदू – अर्जुन राम मेघवाल

‘एआरएआय’तर्फे चाकणमध्ये ‘ग्रीन मोबिलिटी’ला समर्पित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन

एमपीसी न्यूज- तंत्रज्ञानात काळानुसार क्रांती घडत असते. तंत्रज्ञान कुणासाठीही थांबत नसून बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा करून घेणे हा देशातील संशोधनाचा केंद्रबिंदू असायला हवा. तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आणि संतुलित दृष्टीकोन ठेवूनच आपल्याला पुढे जावे लागेल,असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले.

‘ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे (एआरएआय) चाकण येथे सुरू करण्यात आलेल्या हरित वाहतुकीला (ग्रीन मोबिलिटी) समर्पित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे मंगळवारी (दि. 18) मेघवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

या प्रकारचे हे भारतातील पहिलेच केंद्र असून केंद्र सरकारचा अवजड उद्योग विभाग व फेम इंडिया स्कीमच्या सहकार्याने त्याची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रावर एकूण 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातील ३० टक्के गुंतवणूक केंद्र सरकारकडून, तर ७० टक्के गुंतवणूक एआरएआयकडून करण्यात आली आहे. एआरएआयच्या संचालक रश्मी उर्ध्वरेषे, अध्यक्ष सी. व्ही. रामन, उपाध्यक्ष राजेंद्र पेटकर, संस्थेचे वरिष्ठ अधिकारी ए. ए. देशपांडे, एन. व्ही. मराठे, के. श्रीनिवास, व्यवस्थापकीय संचालक अभिजित मुळे यावेळी उपस्थित होते.

मेघवाल म्हणाले, ‘‘पर्यावरणाचे रक्षण आणि विकास या दोन्हीचे संतुलन महत्त्वाचे असून देश त्याला अनुसरुनच पुढे जात आहे. संशोधन व विकासाच्या दृष्टीने भारतातील परिस्थिती उत्तम आहे. वाहन उद्योगात हळूहळू तेजी दिसायला सुरूवात झाली आहे. हरित वाहनांचा वेग, चार्जिंग अशा गोष्टींविषयी असलेल्या शंका दूर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्राची प्रगती निश्चित आहे.’’

केंद्र सरकारच्या नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशनला अनुसरून उभारण्यात आलेल्या या केंद्रात हरित वाहनांच्या निर्मितीदरम्यान गरजेच्या असलेल्या चाचणी सेवा पुरवल्या जातात. या ठिकाणी उभारण्यात आलेला ई-मोटर टेस्ट बेड 30 किलोवॅट, 150 किलोवॅट आणि 250 किलोवॅट अशा सर्व प्रकारच्या ई-वाहनांचे चलनवलन, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी उपयुक्त ठरतो. इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वाचे असलेले 100 किलोवॅट आणि 250 किलोवॅटचे बॅटरी इम्युलेटर, बॅटरी चाचणी तसेच वाहनातून होणारे हवा प्रदूषण तपासण्यासाठीच्या इंजिन चाचणी यंत्रणेचाही केंद्रात समावेश आहे. सर्व भारतीय व युरोपीयन नियमांनुसार या केंद्रात चाचण्या करता येतात. भविष्यात हायड्रोजन इंधनांवर चालणा-या वाहनांच्या चाचण्या करण्यासाठीची यंत्रणाही या केंद्रात प्रस्तावित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.