Charholi : च-होली -लोहगांव रस्त्याच्या कामात ‘रिंग’ ?; चौकशी करण्याची मागणी

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी

एमपीसी न्यूज -च-होली ते लोहगांव हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याच्या दुस-या टप्प्यातील कामाच्या निविदेत रिंग झाल्याचा आरोप करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. पदाधिकारी आणि अधिका-यांच्या बरोबरीने आयुक्त देखील यामध्ये सहभागी आहेत. या अर्थपूर्ण मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, पुणे आळंदी रस्त्यापासून च-होली ते लोहगांव हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करणे (भाग दोन) या कामांच्या निविदा उघडण्यात आल्या आहेत. या निविदेचे अवलोकन केले असता. ठराविक ठेकेदारांनीच निविदा भरलेल्या दिसून येत आहेत. त्यातील तब्बल चार कोटीची जादा दराची निविदा मंजूर करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या निविदेमध्ये रिंग झाल्याचा सशंय आहे.

एकसारख्या कामात हे ठेकेदार संगनमताने रिंग करुन एका कामात दोन ठेकेदार जादा दराने निविदा भरतात. तसेच रिंगमधीलच तिसरा ठेकेदार कमी दराची निविदा भरतो. याउलट दुस-या कामात कमी दराने भरलेली निविदा जादा दराने भरतो व जादा दराने भरलेली निविदा कमी दराने भरतो. यामुळे अनुक्रमे या ठेकेदारानांच ही कामे मिळतात.

महापालिकेतील भाजप पदाधिकारी व अधिका-यांच्या बरोबरीने आयुक्त स्वत: सुध्दा यात सामील आहेत. या अर्थपूर्ण मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी होत आहे. या प्रकरणातून भाजप पदाधिका-यांचा पारदर्शक कारभार उघड झाला आहे. या निविदेमध्येही रिंग झाल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रीयेची सखोल चौकशी करण्यात यावी. निविदा प्रक्रीयेतील संबंधित दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी. तोपर्यंत निविदा प्रक्रीया थांबविण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.