Pune : पुण्याचा पारा 5. 9 अंशावर ; दहा वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

एमपीसी न्यूज- पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये थंडीचा कडाका कायम राहिला असून आज, शनिवारी पुण्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 5.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे .

निरभ्र आकाश आणि उत्तर भारताकडून येणाऱ्या अति थंड वाऱ्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरांमध्ये तापमानाचा पारा घसरल्याने पुणेकर अक्षरश: गारठले आहेत. कमाल तापमानातही घट झाल्याने दिवसाही थंड वारे जाणवत आहे. शुक्रवारी हंगामातील नीचांकी 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंड वाऱ्याचे वाढते प्रवाह आणि तापमानाचा पारा आणखी घसरून गारठा वाढू शकतो असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रात्री शेकोट्या पेटविण्यात येत असल्याचे चित्र आहे त्याचप्रमाणे बहुतांश भागात पहाटे धुके पसरल्याचे पाहायला मिळत आहे. .

गेल्या तीन दिवसांपासून शहरात थंडी वाढत आहे. सध्या आकाश स्वच्छ व निरभ्र आहे हीच स्थिती पुढील सहा सात दिवस कायम राहणार असल्याची शक्यता आहे. ही स्थिती थंडीला पोषक असल्याने तापमानाचा पारा आणखी घसरून थंडी वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.