Chikhali :हॉर्स रायडिंगसाठी मैदान भाड्याने देताना मौन बाळगणारे माजी लोकप्रतिनिधी जागे; केली ‘ही’ मागणी

एमपीसी न्यूज – मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान (Chikhali)घोडेस्वारीसाठी (हॉर्स रायडिंग) भाड्याने देण्यास स्थानिक नागरिक तीव्र आक्षेप घेत असताना कोणतीही भूमिका न घेणारे माजी लोकप्रतिनिधी मैदान भाड्याने दिल्यानंतर आता जागे झाले आहेत. जाधववाडी, बोऱ्हाडेवाडीत स्थानिक नागरिकांसाठी खेळाचे मैदान, उद्यान विकसित करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

चिखलीतील एक हेक्टर जागा महापालिकेने सन 2005 साली खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली होती. 15 हजार 600 चौरस मीटर भूखंड सन 2010 मध्ये हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) मोबदल्यात मूळ मालकाकडून महापालिकेच्या ताब्यात आला.

Maval : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेत मागणी

मैदानालगत सीमाभिंत बांधून हे मैदान (Chikhali)नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या परिसरात मोठ-मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. या गृहसंस्थांमधील आबालवृद्ध या मैदानाचा वापर चालणे, धावणे, कवायत करणे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आदीसाठी करत होते.

महापालिका प्रशासनाने हे मैदान थेरगाव येथील कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान या संस्थेला हॉर्स घोडेस्वारीसाठी करारपद्धतीने ठराव करुन चालविण्यास मोफत दिले. ही संस्था प्रतिव्यक्ती आठ ते दहा हजार रुपये शुल्क आकारणार आहे, याला सर्व नागरिक विरोधात करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणतीही भूमिका घेतल्याचे दिसले नाही.

जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात नागरीकरण वाढले असून, स्थानिक नागरिकांसाठी पायाभूत सोयी-सुविधा सक्षम कराव्यात. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान आणि मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करावे, अशी मागणी आज केली. मोशी, बोऱ्हाडेवाडी आणि जाधववाडी परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिंधिनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे, निलेश बोराटे, संतोष जाधव, निखिल बोऱ्हाडे, सोनम जांभुळकर आदी उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवदनामध्ये म्हटले आहे की, जाधववाडी- बोऱ्हाडेवाडी येथे ‘एसटीपी’ची जागा ही खेळाच्या मैदानासाठी योग्य आहे. तसेच, परिसरात गार्डनसाठी एकही आरक्षण नाही. त्यामुळे खेळाचे मैदान व गार्डन हे 1/ 130 या आरक्षणामध्ये गट नंबर 90 मध्ये विकसित करण्यात यावे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गाव जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी या भागातील सोसायटीधारक आणि रहिवाशांची संख्या मोठी आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या भागात उद्यान व खेळाचे मैदान विकसित करण्याची आवश्यकता आहे, अशी भावना स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.