Chinchwad : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणा-या चार हजार 800 रिक्षांवर कारवाई; 165 वाहनचालकांवर खटले दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणा-या रिक्षांवर कारवाई केली आहे. चार हजार 874 रिक्षांवर कारवाई करत 11 लाख 67 हजारांचा दंड घेण्यात आला आहे. तसेच 165 अवैध प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अनेक वेळेला कार चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अवैधरित्या प्रवासी वाहतूक करतात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवून वाहतूक केली जाते. यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. या वाहन चालकांवर वचक निर्माण होण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

एक जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत क्षमेतपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणा-या चार हजार 874 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर 11 लाख 67 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणा-या 165 अन्य वाहनांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या, “कारवाईची ही मोहीम यापुढे देखील सुरु राहणार आहे. रिक्षा चालकांनी व चारचाकी वाहन चालकांनी अवैधरित्या, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहन चालवू नये. तसे निदर्शनास आल्यास संबंधित वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहने चालविण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.