Chinchwad : फॅन्सी नंबर प्लेट लावणा-या 236 वाहन चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज –  दुचाकी वाहनांचा सायलंसर बदलणा-या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणा-या 236 वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. 18 ते 25 ऑक्टोबर या आठवडाभरात ही कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तांनी याबाबत आदेश दिल्यानंतर कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे.

बुलेट सारख्या दुचाकी वाहनांचा सायलंसर बदलून मोठा आवाज करणारा सायलंसर लावण्याचे प्रकार सर्रास दिसतात. मोठमोठ्या आवाजात दुचाकी चालवून, इतरांना नाहक त्रास देऊन ही मंडळी ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए मे उडाता चला गया’ अशा अविर्भावात शहरात गीरट्या घालताना दिसतात. यामुळे रस्त्याच्या आसपासच्या परिसरात राहणारे नागरिक, वृद्ध, रुग्ण, लहान मुले यांना खूप त्रास होतो.

त्यातच फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचे देखील प्रकार सुरु आहेत. आकड्यांची मोडतोड करून कलात्मकतेने त्यापासून नाव बनविणे. नंबर न दिसेल अशा रीतीने नावे, फोटो, डिझाईन लावण्याचा शो ऑफ केला जातो. मात्र, हा कायद्याने गुन्हा आहे.

वरील दोन्ही प्रकारांबाबत पोलीस आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशाला जागून वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आणि आठवडा भरात 236 वाहन चालकांवर कारवाई केली. बुलेटचा सायलंसर बदलल्यास एक हजार रुपये तर  फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास दोनशे रुपयांचा दंड आहे.

आठवडाभरात बुलेटचा सायलन्सर बदलणाऱ्या 173 जणांवर कारवाई करीत एक लाख 73 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 36 हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूलही केला आहे. तर फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या 63 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत पोलिसांनी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बहुतांश पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडे बुलेट असून त्यांनीही सायलेंसर बदलला आहे. मात्र अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.