Chinchwad By election : लढत कोणामध्ये होणार? राजा वही बनेगा, जो काबील होगा; विरोधकांचा नारा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad By election) पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधु शंकर जगताप यांच्या नावाची भाजप वर्तुळात चर्चा सुरु झाली. तर, राष्ट्रवादीकडून नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, शिवसेनेचे राहुल कलाटे, नवनाथ जगताप यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. विरोधकांनी राजा वही बनेगा, जो काबील होगा असा नाराही दिला आहे. त्यामुळे पोटनिवडणूक चुरशीची होईल. भाजप-राष्ट्रवादी की महाविकास आघाडी आणि कोणत्या उमेदवारांमध्ये निवडणूक होईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपने राष्ट्रवादीच्या विरोधात पोटनिवडणूक लढविल्याने चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता खूपच कमी दिसते. या निवडणुकीकडे आगामी पालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जाते. शहरात पहिल्यांदाच विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे.

चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान तर, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. ही पोटनिवडणूक महापालिका निवडणुकीची पायाभरणी असेल. त्याकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जाईल.

चिंचवडमधून सर्वाधिक नगरसेवक महापालिकेत निवडून येतात. त्यामुळे चिंचवड ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न राहील. निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार नाना काटे यांचे ‘राजा का बेटा राजा नही बनेगा’, ‘राजा वही बनेगा, जो काबील होगा’, ‘पक्षाचा आदेश जनतेचा आर्शिवाद’, ‘चिंचवडकरांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध’, ‘निर्धार महाविजयाचा, कसं, दादा म्हणतील तसं, आमचं ठरलय’! असे (Chinchwad By election) मजकूर असलेले फलक सोशलमिडीयावर झळकले आहेत. त्यामुळे विरोधकांनी लगेच तयारी सुरु केल्याचे दिसते.

Pimpri News: पालिका निवडणूक वर्षभरापासून लांबणीवर अन् विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या 15 दिवसांत जाहीर

चिंचवडच्या निवडणुकीत पिंगळेगुरव, सांगवी या पट्यातील मते निर्णायक ठरतात. ही मते तीनही वेळेस निर्णयाक ठरली होती. पहिल्यांदा अपक्ष आणि दोनवेळा भाजपकडून लढलेल्या जगताप यांना या भागातून मताधिक्य होते. भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर, भाजपच्या रहाटणीतील एका माजी नगरसेवकानेही उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

तर, महाविकास आघाडी एकच उमेदवार देणार की वेगवेगळे लढणार हे ही पाहणे महत्वाचे आहे. मागीलवेळी निवडणूक लढविलेले आणि कडवी झुंज दिलेले राहुल कलाटे, विधानसभा लढविण्याचा अनुभव पाठिशी असलेले राष्ट्रवादीचे नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे हेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप हेही मैदानात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pune Railway : विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून नऊ महिन्यात 1 कोटी दंड वसूल

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून 78 हजार मते घेऊन जिंकले. नंतर 2014 मध्ये भाजपकडून 1 लाख 23 हजार मते मिळाली आणि त्यांनी शिवसेनेच्या राहुल कलाटे यांचा पराभव केला. त्या निवडणुकित राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, दोन बलाढ्य अपक्ष असे सर्वजण स्वतंत्र असल्याने जगताप विरोधकांची मते बरोबरीत असून ती विभागल्याने भाजपचा विजय सोपा होता. पुढे 2019 मध्ये भाजपकडून 1 लाख 50 हजार मते घेऊन जगताप यांनी हॅट्रीक केली.

पण, त्यांच्या (Chinchwad By election) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने अपक्ष लढलेल्या शिवसेनेच्या राहुल कलाटे यांना पाठबळ दिल्याने चुरस झाली. अपक्ष लढलेल्या कलाटे यांनी तब्बल 1 लाख 12 हजार मते मिळाली होती. आता जगताप समोर नाहीत आणि त्यांच्या तोडिचा दुसरा उमेदवार भाजपकडे नसल्याने विरोधकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे निवडणूक कोणत्या उमेदवारांमध्ये होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बिनविरोधची शक्यता कमीच

आगामी महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता मिळवायची झाल्यास चिंचवड विधानसभा बिनविरोध भाजपला देऊन परवडणारे नाही, याची राष्ट्रवादीला पूरती जाण आहे. त्यामुळे बिनविरोधची शक्यता धूसर दिसते. निवडणूक लढविण्याबाबत त्या-त्या वेळची परिस्थिती बघून आम्ही योग्य तो निर्णय घेवू, हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे भाष्य बरेच काही सांगून जाते. यापूर्वी राज्यात 4 पोटनिवडणुका झाल्या.

दिवंगत आमदारांच्या घरात उमेदवारी दिल्यास एक राजकीय सभ्यता म्हणून तिथे विरोधक उमेदवार देत नाहीत, असा प्रघात होता. देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकित राष्ट्रवादी, काँग्रेसने भाजपला मिनतवाऱ्या करूनही त्यांनी उमेदवार दिला. राष्ट्रवादीची पंढरपूरची जागा हिसकावून घेतली. गेल्या तीन वर्षांतील या राजकीय घडामोडी पाहता चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोधची शक्यता दुर्मीळ दिसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.