Chinchwad Bye Election : राहुल कलाटे निवडणूक लढविण्यावर ठाम; आज एकानेही घेतली नाही माघार

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीतून उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. आज (गुरुवारी) एकाही अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. (Chinchwad Bye Election) उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार की 33 जणही निवडणुकीच्या रिंगणात राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्‍विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे, अपक्ष म्हणून राहूल कलाटे यांच्यासह 33 उमेदवार रिंगणात आहेत. (Chinchwad Bye-Election) या 33 उमेदवारांमध्ये दोन राष्ट्रीयकृत पक्षाचे, 5 नोंदणीकृत पक्षाचे तर 26 अपक्षांचा समावेश आहे. काल बुधवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज (गुरूवार) आणि उद्या (शुक्रवार) अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. गुरूवारी सकाळी 10 ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. या वेळेत एकानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांची बंडखोरी शमविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. माघार घेण्याची विनंती त्यांना केली जात आहे. परंतु, जनभावनेचा अनादर मी करणार नाही. आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे कलाटे यांनी सांगितले.

ठाकरे गटाचे नेते, पुण्याचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची उद्या भेट घेणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अहिर यांच्या भेटीत कलाटे यांचे समाधान होईल का, कलाटे माघार घेतील का, निवडणूक लढण्यावर ठाम राहतील, याकडे चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, चिंचवड मतदार संघात 510 मतदान केंद्र आहेत. एका बॅलेट युनिटवर 15 उमेदवार आणि एक नोटा असे 16 पर्याय उपलब्ध असतात. (Chinchwad Bye Election) 33 उमेदवार असल्याने 1 बॅलेट युनिटवर 15 उमेदवार असे 3 बॅलेट युनिट लागणार आहेत. 510 मतदान केंद्रासाठी तब्बल 1 हजार 530 बॅलेट युनिट लागणार आहेत. बॅलेट युनिटची संख्या वाढली की मतदान आणि मतमोजणीसाठी उशिर होण्याची शक्‍यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.