Chinchwad : सायबर चोरटे परदेशात पण बँक खाती मात्र भारतात

एमपीसी न्यूज – सायबर चोरटे नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून बँक खात्यांवर ( Chinchwad) रक्कम घेतात. हे सायबर चोरटे विदेशात बसून गुन्हे करतात, मात्र त्यांच्या वापरातील बँक खाती भारतात असतात. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये जी बँक खाती येतील, ती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Pimpri : माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने क्रिडा, कला, विकास प्रकल्पास क्रिडा साहित्य भेट

गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात दररोज कोणीतरी ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहे. यात सर्वाधिक मोठी संख्या उच्चशिक्षित आणि आयटीयन्सची आहे. अतिरिक्‍त पैशांच्या मोहापोटी लाखो रुपये गमविणाऱ्यांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने कडक पावले उचलली आहेत. सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या खात्यातील पैसे चोरून ज्या खात्यामध्ये टाकले आहेत ती खाती बंद करण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात सायबर गुन्हेगारांना चाप बसणार आहे.

ऑनलाइन टास्क किंवा टेलिग्राम, व्हाट्‌स अप अशा सोशल मीडियाचा वापर करून चोरटे परदेशात बसून भारतातील नागरिकांची फसवणूक करतात. या चोरट्यांना अटक करण्यात अनेक कायदेशीर अडचणी आहेत. मात्र हे सायबर चोरटे चोरी केलेली रक्कम भारतातील बॅंकेतच घेतात. भारतातील काही व्यक्तींना कमिशन देऊन ही रक्कम ते परदेशात पाठविण्यास सांगतात.

चोरट्यांची बँक खाती बंद

बँक खात्यातील पैसे चोरीला गेल्यावर पोलीस एनसीसीआर (नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग) या केंद्र शासनाच्या पोर्टलवर नागरिकांना तक्रार करण्यास सांगतात. तक्रार करताना यामध्ये आपल्या कोणत्या बॅंकेतून, कोणत्या ट्रांजेक्‍शनद्वारे पैसे चोरीला गेले आहेत, याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. ट्रांजेक्‍शन आयडी वरून आपले पैसे कोणत्या खात्यात गेले आहेत, याची माहिती शासनाला मिळते. त्यानुसार सायबर चोरट्यांनी फसवणुकीसाठी वापरलेली अशी बँक खाती बंद करण्याचे आदेश शासनाने बॅंकांना दिले आहेत. त्यामुळे शासनाकडून माहिती मिळताच सायबर चोरट्यांची ही बॅंक खाती बंद केली जात आहेत.

सायबर चोरट्यांनी लढवली शक्कल

शासनाकडून सायबर चोरट्यांचे बॅंक खाते बंद केले जाते. त्यामुळे त्यांच्या खात्यात आलेल्या पैशाचा त्यांना उपयोग करता येत नाही. ही बाब सायबर चोरट्यांच्या लक्षात आली आहे. यावर सायबर चोरट्यांनी शक्कल लढवली आहे. सायबर चोरटे आपल्या खात्यात आलेले पैसे अवघ्या दोन तासांत इतर खात्यामध्ये ट्रान्सफर करतात. त्यामुळे केंद्र शासनाने जरी सायबर चोरट्यांची ही खाती बंद केली तरी त्या सायबर चोरट्यांना फारसा फरक पडत नाही.

चोर पोलीस खेळ सुरु

सायबर चोरटे चोरलेली रक्कम अवघ्या काही तासांत दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. ही बाब शासनाच्या लक्षात आली. त्यामुळे शासनाने अशा बँक खात्यांमधून ज्या ज्या खात्यांवर पैसे जातील, ती खाती देखील बंद करण्याचा निर्णय घेतला. चोर-पोलीस असा खेळ सुरु झाल्याने आता सायबर चोरट्यांची चांगलीच तंतरली आहे.

मजा एकाची सजा एकाला

ज्या बॅंक खात्यामध्ये सायबर चोरटे पैसे ट्रान्सफर करतात ती सर्व खाती बंद करण्यात येत आहेत. मात्र याचा फटका काही व्यापाऱ्यांना बसला आहे. चोरट्यांनी एखादी मोठी वस्तू खरेदी केल्यावर त्याचे पेमेंट चोरलेल्या त्या पैशातून केले जाते. ज्या दुकानदाराकडून वस्तू खरेदी केली आहे, त्याला सायबर चोरटा किंवा त्याने केलेल्या चोरीबाबत माहिती नसते. त्या दुकानदाराला केवळ वस्तूच्या बदल्यात पैसे मिळालेले असतात. अशावेळी शासनाच्या निर्णयानुसार त्या व्यापाऱ्याचेही बॅंक खाते बंद होते.

काही दिवस स्थगिती

शासनाने एप्रिल महिन्यात या आदेशाची अंमलबजावणी सुरु केली होती. मात्र शासनाच्या या आदेशाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसू लागला. यामुळे एप्रिल महिन्यात सुरू केलेल्या या निर्णयाला काही वेळेसाठी स्थगिती दिली आहे. यामध्ये आणखी कठोर उपाययोजना करता येतील का, याबाबत शासनाचा विचार ( Chinchwad)  सुरु आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.