Chinchwad Crime News : ‘म्युकर मायकोसिस’वरील औषधांची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज – अँटी फंगल या साथीच्या आजारावरील इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री केल्या प्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला गुंडा विरोधी पथकाने काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून liposomal Amphotericin B injection चे 14 नग आणि Amphotericin B liposom for injection चे आठ नग, असा एकूण एक लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुरुवातीला पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करून शरणबसवेश्वर सिद्धेश्वर ढमामे (वय 38, रा. विजापूर रोड, सोलापूर) याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून अटक केली.

औषधांचा अवैध पुरवठा गुलबर्गा येथून होत असल्याचे पुढील तपासात समोर आले. पोलिसांनी गुलबर्गा येथे सापळा लावून आरोपी राजशेखर कासाप्पा भजंत्री (वय 33, रा. गुलबर्गा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून liposomal Amphotericin B injection चे 14 नग आणि Amphotericin B liposom for injection चे आठ नग असा एकूण एक लाख 44 हजारांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

आरोपी भजंत्री हा गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गुलबर्गा या शासकीय रुग्णालयात कोविड तसेच म्युकर मायकोसिस विभागात नर्सिंग स्टाफ आहे. त्यामुळे या प्रकरणात मेडिकल कॉलेजमधील आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे. तसेच आरोपींनी सोलापूर येथे देखील काही औषधे विकली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.