Chinchwad News :  ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ ; पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा शंकर महाराज सेवा मंडळाचा समाजोपयोगी उपक्रम

एमपीसी न्यूज – गणपती उत्सवात पूजन केल्या जाणा-या गणेशमूर्तीमध्ये रासयनिक रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा (POP) वापर वाढल्याने पर्यावरणास हानी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती पूजनाबाबत जनजागृती केली जाते.

‘शंभर टक्के शाडूच्या मातीचा वापर करून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविली जाते. ग्राहकाला त्याची किंमत ठरवता येते आणि जमा झालेल्या रकमेतून वृद्धाश्रम चालवले जाते. याशिवाय अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. चिंचवड येथील शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने मागील सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.

याबाबत माहिती देताना शंकर महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष अविनाश वैद्य म्हणाले, ‘मागील सात वर्षांपासून आम्ही पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा उपक्रम राबवत आहे. आम्ही निर्माण करत असलेल्या मूर्ती या शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या असतात. त्याचे रंगकाम देखील नैसर्गिक रंगापासून केले जाते. कारखाना निर्मीत एकही वस्तू गणेश मूर्तीच्या निर्मीतीसाठी वापरली जात नाही. विशेष म्हणजे आमच्या मूर्तीला कोणतेही विक्री मूल्य नाही. ग्राहकांना पंसतीस पडलेल्या कोणत्याही मूर्ती ते विकत घेऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना योग्य वाटेल ती रक्कम ग्राहक दान करू शकतात.’

अविनाश वैद्य म्हणाले, ‘आमच्याकडे 6 ते 24 इंच या आकारातील विविध गणेश मूर्ती उपलब्ध आहेत. यामध्ये दगडूशेठ हालवाई, जय मल्हार, बाजीराव, लालबागचा राजा, पेशवा गणपतीची प्रतिकृती आम्ही तयार करतो. गणेश मूर्तींचे कलादालनात प्रदर्शन मांडले जाते. तेथून त्या ग्राहक घेऊन जाऊ शकतात.

‘शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने मागील सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, पठाणकोटपर्यंत मूर्ती पोचल्या आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, ग्रेट ब्रिटन, बेल्जियम या देशात देखील आमच्या मूर्ती पोचल्या आहेत. मिळालेल्य रकमेतून आम्ही किवळे येथे ‘स्नेह सावली, आपले घर’ या नावाने वृद्धाश्रम चालवतो. येथे अनेक निराधार ज्येष्ठ नागरिकांना आश्रय दिला जातो. याशिवाय, वैद्यकिय मदत, रक्तदान व आरोग्य शिबिरे राबविली जातात’, असे अविनाश वैद्य यांनी सांगितले.

कधी आणि कुठे मिळतील मूर्ती

4 ते 10 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत श्रीराम मंदीर, चापेकर वाडा, चिंचवडगाव याठिकाणी या गणेश मूर्ती उपलब्ध होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.