Pune News : महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारु दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शंखनाद करण्यात येत आहे, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आयोजित केलेल्या शंखनाद आंदोलनात पाटील यांनी पुण्यात सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिर उघडण्यासाठी सबुद्धी मिळावी, यासाठी पाटील कसबा गणपतीला साकडं घालून गणपतीची महाआरती केली.

या आंदोलनात पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आमदार मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन सुरळीत झालं, त्यानंतरही सर्व सुरु झालं, मात्र मंदिरं सुरू झाली नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होण्याआधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याचे आग्रही होते. पण अल्पसंख्याकांच्या मतांसाठी धर्म न मानणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर मंदिरं उघडण्याला माझं प्राधान्य नाही, असं ते दाखवू लागले. आता त्यांना वारकऱ्यांचे श्रद्धाळूंचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यांना फक्त नोटांचे, नोटा देणाऱ्यांचे, दारु दुकानदारांचे आवाज ऐकू येतात.”

ते पुढे म्हणाले की, “कोरोनाचे दोन्ही लाटेत सर्वांनी निर्बंधांचं कटाक्षाने पालन करुन, सरकारला सहकार्य केलं. मात्र, कोरोनाची लाट ओसरु लागल्यानंतर हे सरकार लोकांना त्यांना जगण्याचा अधिकार नाकारु लागलं. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिरासंबंधीत जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असतानाही राज्य सरकार डोळे झाकून बसली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “हिंदू जसे मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, त्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख आणि जैन बांधव हे मस्जिद आणि चर्च, गुरुद्वारा, जैन मंदिर मध्ये जाऊन प्रार्थना करतात. या सर्वांनी प्रार्थनेसाठी मंदिरात जायचं नाही, तर मातोश्रीत जायचं का?” असा सवाल उपस्थित करत मंदिर उघडण्यासंदर्भातील आदेश तात्काळ जारी करावा, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मंदिराचे कुलूप तोडून, मंदिरे सर्व सामान्यांसाठी खुली करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवत, मंदिरे तातडीने खुली करावीत, अशी मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.