Chinchwad News: गढूळ, कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे सुदर्शनगरमधील रहिवासी हैराण

एमपीसी न्यूज – गढूळ आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे चिंचवड येथील पारीजातबन, सुदर्शनगरमधील रहिवासी हैराण झाले आहेत. गृहसंकुलांना मोठ्या आकाराच्या जलवाहिनी बसचिण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पारीजातबन, सुदर्शनगर परिसरात अनेक शेकडो कुटुंबीय 1966 पासून वास्तव्य करीत आहे. अनेक गृहसंकुलात पिण्याच्या पाण्याची नलिका सोसायटी आवारातील बांधण्यात आलेल्या भुमिगत सिमेंटच्या टाकीत पिण्याचे पाणी पालिकेच्या जलवाहिनीद्वारे सध्या दिवसाआड येते. तेच पाणी गृहसंकुलातील नागरिकांच्या वतीने विद्युत पंपाच्या माध्यमातून गृहसंकुलावरील टाकीत सोडले जाते. तेथून गृहसंकुलातील रहिवासीयांना बंद नलिकेतून पाण्याचा पुरवठा होतो. काही गृहसंकुलाच्या तळमजल्यावर नळाची व्यवस्था केली असून अनेक रहिवासी तेथून कळशी, हंडा, बादलीत पाणी भरून पिण्यासाठी घरोघरी वापरतात. गेल्या काही दिवसांपासून परिसरात संध्याकाळी उशिरा पिण्याचे पाणी करंगळीपेक्षा बारीक येत असून त्यात गढूळ पिण्याचे पाणी येत असल्यामुळे हैराण झाले आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर पिण्याचे पाणी कसे घेवून जायचे हा प्रश्न त्यांना उदभवला आहे. अनेकवेळेला विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे भुमिगत पाण्याच्या टाकीतून गृहसंकुलावरील पाण्याच्या टाकीत विद्युत पंपाद्वारे पाणी पोहचत नसल्यामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या वतीने गृहसंकुलांना जलवाहिनी मोठ्या आकाराच्या बसण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

गढूळ पिण्याच्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पालिका आयुक्तांनी तातडीने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आदेश देवून गढूळ व कमी दाबाने पाणी येत आहे, याची माहिती घ्यावी. तसेच, गढूळ पिण्याचे पाणी येण्याचे काय कारणे आहेत, याचा शोध घ्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व्ही.जे.एन.टी. सेलचे कार्याध्यक्ष गुलामअली भालदार यांनी ई-मेल द्वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.