Chinchwad : मराठी कवयित्रींच्या कवितांनी चिंचवडकर मंत्रमुग्ध

पाणीदार माणूस पुरस्कार प्रवीण लडकत यांना प्रदान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने जलपर्णीमुक्त सांडपाणी विरहीत पवनामाई अभियान उगम ते संगम हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘स्वरसायली प्रस्तुत वेचू शब्दरत्ने’ हा संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, शांता शेळके तसेच त्यांच्या समकालीन कवयित्रीच्या रचना, किस्से आणि सुप्रसिध्द गाणी असा बहारदार संगीत कार्यक्रम पवना नदी किनारी जिजाऊ उद्यानात संपन्न झाला. पहिल्या वर्षीचा ‘पाणीदार माणूस’ हा पुरस्कार महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पवनामाईच्या आरतीने सुरवात झाली. मागील सहा महिन्यांपासून नित्याने होणारी पवनामाईची आरती रोटरी सदस्य आणि नागरिकांनी केली. बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन वढाय वढाय’, ‘अरे खोप्या मधी खोपा’, ‘अरे संसार संसार’ तर संत जनाबाई यांच्या ‘जणी उकलिते वेणी’, ‘धरिला पंढरीचा चोर’, ‘येग येग विठाबाई’, इंदिरा संत यांच्या ‘आला शिशिर संपत पानं गळती सरली’, ‘अजून नाही जागी राधा’, ‘उंच उंच माझा झोका’, ‘रक्ता मध्ये ओढ मातीची’, शांता शेळके यांच्या ‘असेन मी नसेन मी’, ‘आला पाऊस मातीच्या वासात’, ‘काटा रुते कुणाला’ यांसारख्या बहारदार कविता सुप्रसिद्ध गायिका सायली राजहंस आणि गायक चैतन्य कुलकर्णी यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर करून चिंचवडकराना मंत्रमुग्ध केले.

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे यांनी आपल्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. खासदार श्रीरंग बारणे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माया बारणे, आशा शेडगे, प्रशासकीय अधिकारी दिलीप गावडे आदी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत यावर्षी पासून मानाचा पाणीदार माणूस पुरस्कार देण्यात येत आहे. पहिल्या वर्षीचा हा पुरस्कार महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहरवासियांमध्ये नदीविषयी आस्था, आपुलकी राहावी. नदी प्रदुषणाबाबत जनजागृती व्हावी. जास्तीत जास्त नागरिकांनी नदीवर येऊन नदीची व्यथा समजून घ्यावी. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून ‘जलपर्णी मुक्त सांडपाणी विरहीत पवनामाई अभियान उगम ते संगम’ हे अभियान नोव्हेंबर 2017 पासून अविरत सुरु आहे. पवना नदीवर पवनानगर ते दापोडी या 62 किलोमीटरच्या पात्रावर नदी स्वच्छता व जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. या कामात शहर परिसरातील 96 सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. त्या संस्थांचा आणि वैयक्तिक सहभागी असणाऱ्या निसर्ग प्रेमींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

जलपर्णी नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचे कारण शहरातून येणारे मैलामिश्रित व कंपन्याचे रसायनमिश्रीत पाणी नदीत प्रक्रिया न करता मिसळले जाते. त्यामुळे मैलामिश्रित आणि रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, फुटलेले ड्रेनेज लाईन, चेंबर्स यावर योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सर्व ड्रेनेज लाईन एसटीपी प्लांटला जोडने व उर्वरित नाले जैविक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यावर आधारित एक चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. तसेच पवना नदीच्या काही निवडक चित्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, शेखर चिंचवडे, सुधीर मरळ, अॅड. सोमनाथ हारपुडे, युवराज वाल्हेकर, सचिन काळभोर, संतोष वाघ, गणेश बोरा, निलेश मरळ, राजेंद्र चिंचवडे, स्वाती प्रदीप वाल्हेकर, प्रणाली हारपुडे, सचिन कोल्हे, वसंत ढवळे, संदीप वाल्हेकर, तेजस देशपांडे आदी रोटरी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.