Chinchwad : पवनामाई महोत्सवास भरघोस प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे पवनामाई संवर्धनासाठी आयोजित केलेल्या पवनामाई महोत्सवास शहरवासींयाच भरघोस प्रतिसाद मिळाला. यामध्ये संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम झाला. पाण्यावर आणि गोदावरी नदी सवर्धनांवर काम करणाऱ्या गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांना पाणीदार माणूस पुरस्कार प्रदान करण्यात आला. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते.

चिंचवड येथील मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिराच्या भव्य प्रांगणावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्धघाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. महापौर उषा ढोरे, ॲड. सोमनाथ हारपुडे, प्रदीप वाल्हेकर यावेळी उपस्थित होत्या. पवना स्वछता अभियानात मागील दोन वर्षे ग्रामीण भागातील 32 गावातील 27 घाटावर स्वछता करण्यास सहकार्य करणारे पर्यावरणप्रेमी आमदार सुनील शेळके यांचा सत्कार करण्यात आला. शासन स्तरावर पवना नदी संवर्धनासाठी भरीव सहकार्य करण्याचे आश्वासन शेळके यांनी दिले. पवना नदी सांडपाणी मुक्त करण्यासाठी आणि जलपर्णी मुक्त करण्यास पालिकेच्या माध्यमातून या अभियानास सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर ढोरे यांनी दिले.

या महोत्सवात गोदावरी नदी काँक्रीटीकरण मुक्त होण्यासाठी लढणाऱ्या आणि पाण्यावर उल्लेखनीय काम करणाऱ्या नाशिक येथील गोदाप्रेमी सेवा संघाच्या देवांग जानी यांना पाणीदार माणूस पुरस्कार आणि मानपत्र आमदार सुनील शेळके, बी यु भंडारी उद्योग समूहाचे शैलेश भंडारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहरे स्मार्ट होताना नद्यांच्या आरोग्यावर काम झाले पाहिजे. नदी काँक्रिटीकरण आणि सौदर्यकरण करण्यावर भर न देता नदी पुनर्जीवित करण्यावर प्रत्येक शहरात काम झाले पाहिजे असे, देवांग जानी यांनी सांगितले.

जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.. दमलेल्या बाबांची या कहाणी तुला… दूर देशी गेला बाबा… नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, मिसेस स्पायडरमॅन… डिपाडी डिपांग डिचिबाडी डिपांग अशी अनेक गाण्याची मेजवानी उपस्थित रसिकांना देत नात्याचे अतूट भावबंध संदीप आणि सलील कुलकर्णी यांनी उलगडले. संस्कार भारतीच्या पथकाने नदीशी निगडीत गाण्यावर विविध नृत्याविष्कार सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.