Chinchwad crime News : विनामास्क फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड; दंड न भरल्यास होणार गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विनामास्क फिरताना आढळल्यास नागरिकांवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांनी दंड भरण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर थेट भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासात नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतेचे देखील प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिका-यांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दंड आकारणीची कारवाई प्रभावी होण्यासाठी कारवाईचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरताना, थांबलेले असताना, वाहन चालवताना विनामास्क आढळणा-या व्यक्तींवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

विनामास्क फिरणा-या नागरिकांवर वाहतूक विभाग आणि पोलीस ठाण्यांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

कारमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र प्रवास करत असतील तर त्या सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. जाणीवपूर्वक विनामास्क एकत्र प्रवास करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कारमधून एकच व्यक्ती प्रवास करत असेल आणि त्या व्यक्तीने मास्क घातला नाही तरी चालेल. मात्र, त्या व्यक्तीजवळ मास्क असणे बंधनकारक आहे.

दुचाकीवरून प्रवास करणा-या दोन्ही व्यक्तींनी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.

बाह्य शारीरिक व्यायाम करताना सामाजिक अंतर पळून व्यायाम करावा. जॉगिंग, सायकलिंग करताना मास्क घालणे बंधनकारक नाही. मात्र मास्क सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

एखाद्या व्यक्तीने वैद्यकीय कारणांसाठी मास्क घातला नसेल तर चालेल. परंतु त्याची पोलिसांकडून शाहनिशा केली जाणार आहे.

विनामास्क फिरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाईल. व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिल्यास त्या व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.