Chinchwad : बड्या पोलीस ठाण्यांना अभय ?

ठराविक ठिकाणीच पडतात पोलिसांचे छापे

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे ( Chinchwad ) राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्या जात आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील काही अधिकारी इतर ठिकाणी बदलून गेले आहेत. त्यामुळे काही पोलीस ठाण्यांची मदार सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर आल्याने पोलीस ठाण्यांचा कारभार रामभरोसे झाला आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे भागात असलेल्या एका जुगार अड्यावर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी छापा मारला. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेने तब्बल ट्रकभर लोकांना अटक करून गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा मुकाई चौकातील जुगार अडड्यावर छापा मारून, 70 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली.

वरील दोन्ही कारवाया गुन्हे शाखेने केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून पवना, इंद्रायणी, मुळा या प्रमुख नद्या जातात. पवना आणि इंद्रायणी नदीच्या काठावर काहीजण गावठी दारू तयार करण्यासाठी भट्ट्या लावतात. या दारूभट्ट्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. मागील काही दिवसांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशा दारू भट्ट्यांवर कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. नद्यांचा परिसर वगळता इतर ठिकाणी असलेल्या दारूभट्ट्या शोधण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी टोल नाक्यावरून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या जुगाराच्या ‘मॉल’वर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. भट्टी लावणाऱ्या तसेच दारू विकणाऱ्या लोकांवर कारवाई होत आहे. मात्र त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई होणे आवश्यक आहे. चाकण, दिघी, तळेगाव, शिरगाव आणि हद्दीतील बड्या पोलीस ठाण्यांच्या परिसरात ( Chinchwad )असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

बदल्यांमुळे पोलीस ठाण्यांचा कारभार रामभरोसे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. कार्यकारी पदावरील अधिकारी अकार्यकारी पदावर तर ज्यांचा आयुक्तालयातील कार्यकाल पूर्ण झाला आहे, त्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील अधिकाऱ्यांच्या इतर ठिकाणी बदल्या झाल्यानंतर प्रशासकीय कारणांमुळे पोलीस ठाण्यांना अधिकारी देण्यात आले नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्यांचा सर्व कारभार सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. यामुळे शहरातील काही पोलीस ठाण्यांचा कारभार रामभरोसे ( Chinchwad ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.