Maval corona update : तळेगावातील 3 रुग्णांसह मावळातील 4 जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह

Corona test report positive of 4 patients from Maval along with 3 patients from Talegaon आज नवीन चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता 115 वर पोहचली आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज तळेगाव येथील तीन तर लोणावळा येथील एक अशा चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे  मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले. 

आज नवीन चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता 115 वर पोहचली आहे. त्यापैकी 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर मृतांचा आकडा पाचवर पोहचला आहे. तालुक्यात एकूण 66 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

आज नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे येथील तीन तर नांगरगाव(लोनावळा)येथील एका रुग्णाचा समावेश आहे. मावळच्या शहरी भागात 47तर ग्रामीण भागात 68 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरी भागात तळेगावमध्ये सर्वाधिक 39, लोणावळा येथे पाच तर वडगाव मावळ येथे दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तळेगाव येथील प्रभाग क्रमांक 9 मधील 864 तेली आळी, येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाचा तळेगाव दाभाडे गाव भागात हार्डवेअरचा व्यवसाय आहे.सदर व्यक्तीस लक्षणे जाणवत होती म्हणून सोमाटणे येथील स्पर्श हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (दि 30) रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज (दि 2) रोजी कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाला उपचारासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्राच्या कोविड केअर सेन्टर तळेगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे. सदर व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील पाच व्यक्ती आहेत.

प्रभाग क्रमांक 2मधील स्टेशन भागातील तपोधाम​ कॉलनी 21 वर्षीय व्यक्ती एसकेएफ बेअरिंग्स, चिंचवड येथे कार्यरत असून कार्यालयाच्या ठिकाणी एका बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने ही व्यक्ती संक्रमित झाली आहे.सदर रुग्णाला उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आलेले आहे. (दि 1) रोजी स्वॅब घेण्यात आला होता. आज गुरूवार (दि 2)  रोजी कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.या व्यक्तीच्या अतिजोखमीच्या संपर्कातील तीन व्यक्ती आहेत.

प्रभाग क्रमांक 3 मधील रियानो कॉलनी, स्टेशन भाग तळेगाव दाभाडे येथील 42 वर्षीय व्यक्ती महिंद्रा कंपनी, चाकण येथे कार्यरत आहे. सदर रुग्णाला उपचारासाठी जनरल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेले आहे. सदर व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील तीन व्यक्ती आहेत.

नांगरगाव लोनावळा येथील 62 वर्षीय व्यक्तीला लक्षणे आढळल्याने जनरल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज गुरूवारी (दि 2) त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 39 झाली असून 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकाचा मृत्यू झाला तर सक्रिय रूग्णांची संख्या 25 आहे. अशी माहिती तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे यांनी दिली.

या सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात आली असून त्यांचेही स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. लोहारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.