Dehugaon : दूषित पाण्यामुळे इंद्रायणीत दररोज शेकडो माशांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. या दूषित पाण्यामुळे नदीत दररोज शेकडो मृत माशांचा खच पडत आहे. दररोज मासे मृत पडत असल्याने परिसरात दुर्गंधी (Dehugaon ) पसरली आहे.
मागील दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपासून इंद्रायणी नदीमध्ये माशांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा परिसरातून होतो. लोणावळा येथील वस्त्यांमधून तसेच कंपन्यांमधील रसायन मिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. प्रसंगी इंद्रायणी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. नदीचा नाला झाल्याचे दिसत आहे.
Maharashtra : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात
देहूगाव नगरपंचायतच्या वतीने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. मात्र देहुगाव मंदिर परिसरातील घाटावर जलपर्णी जशीच्या तशी आहे. त्यामुळे नगरपंचायतची जलपर्णी काढण्याची मोहीम नेमकी कुठे सुरू आहे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. वाढलेली जलपर्णी आणि प्रदूषित पाणी यामुळे नदीतील पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे पाण्यातील जलचर विशेषत: मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. मात्र ऑक्सिजन अभावी त्यांचा तडफडून मृत्यू होतो.
मागील काही दिवसांपासून देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर मृत माशांचा खच पडला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांकडून हे मासे गोळा केले जात आहेत. मात्र घाटावर येणारे पक्षी हे मृत मासे उचलून इतर ठिकाणी टाकत असल्याने देहूगावकरांची डोकेदुखी वाढू लागली आहे.
आषाढी वारीचा पालखी सोहळा अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. पालखी सोहळ्यासाठी सबंध महाराष्ट्रातून वारकरी देहू नगरीत येत असतात. पुढील काही दिवसांमध्ये वारकऱ्यांचे देहू नगरीत आगमन सुरू होईल. मात्र तत्पूर्वी मृत माशांमुळे पसरलेल्या दुर्गंधीने थैमान घातले आहे. यावर वेळीच उपाय करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात (Dehugaon ) आहे.